Loksabha 2019 : मतदान झाले कमी; पुणेकर झाले ट्रोल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

"पुण्यात जे रुजतं ते राज्यभर जातं' अशी एक म्हण आहे. पण, मतदानात पुणेकर खूपच मागे असल्याचे समोर आले. पुण्यात अवघे 49.84 टक्के मतदान झाल्याने मतदारांवर टीकेची झोड उठली. "ईव्हीएमची घरपोच डिलिव्हरी करायची का?', "1 ते 4 झोपेचा परिणाम दिसतोय', "मतदानाच्या दिवशी पुणेकर पुस्तक दिनात व्यस्त' यासह अनेक विनोद, टोमणे, थेट टीकेच्या पोस्ट व्हायरल होऊन पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल झाले. 

पुणे - "पुण्यात जे रुजतं ते राज्यभर जातं' अशी एक म्हण आहे. पण, मतदानात पुणेकर खूपच मागे असल्याचे समोर आले. पुण्यात अवघे 49.84 टक्के मतदान झाल्याने मतदारांवर टीकेची झोड उठली. "ईव्हीएमची घरपोच डिलिव्हरी करायची का?', "1 ते 4 झोपेचा परिणाम दिसतोय', "मतदानाच्या दिवशी पुणेकर पुस्तक दिनात व्यस्त' यासह अनेक विनोद, टोमणे, थेट टीकेच्या पोस्ट व्हायरल होऊन पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल झाले. 

2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यात 54 टक्के मतदान झाले होते. या वेळी यापेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृती करण्यावर निवडणूक आयोगासह अनेक संस्था, संघटनांनी भर दिला होता. मतदानामध्ये पुणे प्रथम श्रेणीत यावे, यासाठी प्रयत्न केले जात होते. पण, प्रत्यक्ष निम्म्या पुणेकारांनी मतदानाला दांडी मारली आहे. 

पुण्यात 49.84 टक्‍के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर पुणेकर चांगलेच ट्रोल झाले. 

"पुणे 49.84 टक्के; पण नक्षलग्रस्त गरचिरोली 61 टक्के', "पुणे मतदानात उणे', "जगभराच्या मोठमोठ्या गप्पा मारणारे आणि पांडित्य सिद्ध करू पाहणारे मतदानाच्या दिवशी कुठे गायब होतात?', "मतदानाचा हक्क सोडून इतर हक्कांबाबत पुणेकर सजग असतात', "एक बुद्धिमान पुणेकर ः तो काय गणिताचा पेपर आहे का 100 टक्के आणायला', "चुलीवरचे मतदान लिहिले असते, तर कदाचित पुणेकर जास्त संख्येने मतदानाला आले असते', "पुणेकरांची मान खाली', "अर्धे पुणे झोपले ः गेल्यावेळी मोदी लाट; या वेळी उष्णतेची लाट', "पुण्यात मतदान 50 टक्के; पण इतरांना अक्कल शिकवायचे प्रमाण 100 टक्के', "पुण्यात 49 टक्के लोकांनी बोट काळे केले, तर 51 टक्‍क्‍यांनी तोंड!' अशा मेसेजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. 

Web Title: punekar Troll on social media