#PunekarDemands : स्वच्छ, निरोगी शहर पुणेकरांचा हक्कच

#PunekarDemands : स्वच्छ, निरोगी शहर पुणेकरांचा हक्कच

सुका कचरा मंडई संकल्पना राबवा
घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.
- किशोरी गद्रे, जनवाणी
भविष्यात कचरा टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे प्रामुख्याने कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्याचे व्यवस्थापन झाले पाहिजे. घरोघरी ओला, सुका कचरा जिरविण्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. 

शहरात ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल. कचरा निर्माण होणाऱ्या घटकांपासून संबंधित संस्थांना एकत्र आणता येईल. ज्यामुळे कचरा जमा करण्यासोबतच रोजगार, उत्पन्न मिळेल. ही मंडई सक्रिय झाल्यास कचऱ्याचे वर्गीकरण, मूल्य नसलेला किंवा प्रक्रिया न होणारा कचरा एकत्रित होईल. अधिक किमतीचा कचरा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने त्यावर प्रक्रिया आणि उठाव मिळण्यास मदत होईल. कचऱ्याची बाजारपेठ तयार झाल्याने उद्योगही उभारेल. परिणामी, महापालिका आणि अन्य यंत्रणा कचरा वाहतूक आणि प्रक्रियेत होणाऱ्या खर्चात ५० टक्के बचत होईल. 

घातक आणि जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रक्रियेबाबत यंत्रणा नाही. त्यावरील उपायांसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यंत्रणा उभारता येईल. कचऱ्याचे वर्गीकरण वाढविण्यासाठी न्यायालयाचा निकाल लोकांपुढे नेला पाहिजे. त्यासाठी आधी महापालिकेने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. 

  सुका कचऱ्याच्या मंडईसाठी चार ‘एफएसआय’ असलेली देणे
 सुक्‍या कचऱ्याच्या संकलनासाठी कंपन्यांची नेमणूक
  सुक्‍या कचऱ्याच्या पुनर्प्रकियेसाठी यंत्रणा
  बांधकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यासाठी एजन्सी नेमणे

**********************************************************************

सोसायट्यांमध्ये व्हावी सांडपाण्यावर प्रक्रिया
अनेक देशांत संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया होते. मुळात, या ठिकाणी ही समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी पाणीपुरवठा यंत्रणा घेते. पुणे शहरातील यंत्रणेला ते का जमत नाही. जमू शकते, पण पैशांचा हव्यास आणि ठेकेदारांच्या नेमणुकीचाच त्याला अडसर आहे.
- शर्मिला ओसवाल
सांडपाण्याची अडचण दूर करावयाची झाल्यासही कठोर प्रशासन आणि सक्षम धोरण हवे. पाण्याचा गैर व बेसुमार वापर वाढल्यानेच सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. मग, त्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने सुरू केलेले प्रक्रिया प्रकल्प हे शोभेपुरतेच राहिले आहेत. कायद्यानुसार शहरातील प्रत्येक हाउसिंग सोसायटीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. परंतु, किती सोसायट्यांमध्ये हे प्रकल्प आहेत, हेही महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहीत नसावे. त्यामुळे कायद्याला ओलांडून शहरीकरण केले जात आहे. केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम आणि जायका प्रकल्पांतर्गत योजना आखल्या आहेत. पण त्याची नेमकी माहिती महापालिका देत नाही.  

  सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रशासकीय धोरण हवे
  हाउसिंग सोसायट्यांत सांडपाणी प्रक्रिया हवी
  सांडपाणी रस्त्यांवर येणार नाही यासाठी देखरेख 
  पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर करून त्याचा अपव्यय टाळणे

**********************************************************************

ठेकेदारांचे नव्हे; स्वतःचे प्रकल्प हवेत
शहरात केवळ निम्म्या सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. याचाच अर्थ उर्वरित पाणी नदीत मिसळले जाते. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येते. सांडपाण्याच्या मूळ समस्येवर तोंडदेखलेपणाने उपचार होत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्यवाही करणे आवश्‍यक आहे.
रमेश बोतालजी, निवृत्त पाणीपुरवठा अधिकारी, महापालिका

शहराचे पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता सांडपाण्याच्या मूळ समस्येवर विचार न करणे घातक ठरत आहे. समस्या सोडविण्याचा तोंडदेखलेपणा ही पुणेकरांची फसवणूक आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह बहुतांशी खात्यांत तज्ज्ञ अधिकारी आहेत. त्यांनी महापालिकेचे स्वतःचे प्रकल्प उभारले पाहिजेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रकल्प कार्यान्वित होऊन त्याची फलनिष्पत्ती दिसून येईल. प्रक्रियेतून वापरण्यायोग्य पाणी, कोळसा, वीज आदींची निर्मिती होऊ शकते. 

शहर आणि उपनगरांमध्ये सांडपाणी पुनर्वापरासाठी पुरेशी यंत्रणा उभी केली पाहिजे. सध्या रोज ११०० एमएलडी सांडपाणी तयार होत असल्याचे महापालिका सांगते. त्यापैकी पाचशे ते सहाशे एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होत असल्याचा महापालिकेचा दावा आहे. परंतु, एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही. याचाच अर्थ तयार सांडपाणी नदीत मिसळते. सांडपाण्याची समस्या सोडविण्यासाठी ठेकेदार कंपन्या नेमण्याचा घाट घालू नये. 

  शहरात ११०० एमएलडीपैकी निम्म्या सांडपाण्यावरच प्रक्रिया
  एकही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही
  तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी स्वतः प्रकल्प उभारावा
  प्रक्रियेतून वापरण्यायोग्य पाणी, कोळसा, वीज आदींची निर्मिती शक्‍य

*************************************

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com