कारवाई चालेल, पण हेल्मेट नको; पुणेकरांचा दृष्टिकोन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पोलिसांनी वाहनचालकांना हेल्मेट घालण्याविषयी वारंवार आवाहन करूनही दररोज पाच हजार जणांवर केवळ हेल्मेट परिधान न केल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पुणे : पोलिसांनी वाहनचालकांना हेल्मेट घालण्याविषयी वारंवार आवाहन करूनही दररोज पाच हजार जणांवर केवळ हेल्मेट परिधान न केल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. प्रत्येकी 500 रुपयेप्रमाणे 5 हजार जणांकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम होते 25 लाख रुपये. असे असूनही पुणेकरांची हेल्मेटबाबतची बेफिकिरी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे. 

वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाई नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून तीव्र करण्यात येणार आहे. दरम्यान, काही दिवसांपासून पुण्यात चौका-चौकांमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई आणि समुपदेशन करत आहेत. दिवसभरामध्ये वाहतूक पोलिसांकडून अडीच हजार दुचाकीस्वारांवर प्रत्यक्षात आणि वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीद्वारे अडीच हजार वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. 

हेल्मेट न घातल्यामुळे वाहनचालकांना 500 रुपयांचा दंड होत असूनही हेल्मेटच्या वापराबाबत उदासीनता आहे. एकीकडे 500 ते एक हजार रुपयांना मिळणारे हेल्मेट वापरायचे नाही, दुसरीकडे 500 रुपये दंडाची रक्कम भरताना मात्र पोलिसांशी हुज्जत घालून नियम आणि पोलिसांची कार्यपद्धती कशी चुकीची आहे हे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: punekars are not ready for compulsory helmet in city