पुणेकरांनो घाबरु नका, सतर्क रहा..परिस्थिती नियंत्रणात (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

शहरावरील अतिवृष्टीचा धोका टळला असून, येत्या तीन-चार दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता असली तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे :  शहरावरील अतिवृष्टीचा धोका टळला असून, येत्या तीन-चार दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता असली तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

हवामानशास्त्र विभागाने चार  ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. सहा ते आठ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी अतिवृष्टीचा धोका टळलेला आहे. जिल्ह्यात मुळशी आणि मावळ तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड भागात नदीकाठच्या भागातील तीन हजार 343 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांना समाज मंदिर आणि शाळेमध्ये राहण्याची आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाणी ओसरल्यानंतर त्यांच्या घरांचे पंचनामे करून त्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येईल.

जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 18 धरणांमध्ये पाणीसाठा शंभर टक्के असून, उर्वरित सहा धरणामध्येही पाणीसाठा 95 टक्क्यांच्या आसपास आहे. जिल्ह्यात पाच ऑगस्टअखेर  वार्षिक सरासरीच्या तुलनेत 108 टक्के पाऊस झाला आहे. त्यात मावळ तालुक्यात 200 टक्के, मुळशी 134 टक्के, भोर 141 टक्के, जुन्नर 127 टक्के आणि खेड तालुक्यात 139 टक्के पाऊस झाला आहे. मात्र, इंदापूर तालुक्यात 31 टक्के, दौंड 40 टक्के, बारामती 58 टक्के आणि शिरूर 59 टक्के पाऊस झाला असून, या चार तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे. सध्या बंडगार्डन येथून एक लाख 34 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, ही पातळी धोक्याच्या रेषेखालील आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekars be careful Dont be afraid situation is under control