#PunePolice चोऱ्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षितता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे - शहराच्या विविध भागांत दररोजच चार ते पाच मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत असतातच. बुधवारी वटपौर्णिमेच्या दिवशी तब्बल १२ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे.

पुणे - शहराच्या विविध भागांत दररोजच चार ते पाच मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत असतातच. बुधवारी वटपौर्णिमेच्या दिवशी तब्बल १२ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांचे मंगळसूत्र चोरण्याच्या घटना पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये घडल्या. वटपौर्णिमेला मंगळसूत्र चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचा अनुभव असूनही पोलिसांना त्यावर नियंत्रण मिळविणे शक्‍य झालेले नाही. पोलिसांना आव्हान देत एकाच दिवसात सर्वाधिक साखळी चोरीचे गुन्हे करण्याचा उच्चांकही चोरट्यांनी निर्माण केला.

खडकी पोलिसांच्या ‘प्लॅन’ची गरज 
खडकीमध्ये मागील दीड महिन्यात महिलांच्या मंगळसूत्र चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी खडकी व विश्रांतवाडी पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या तपास केला होता. चोरीच्या पद्धतीचा अभ्यास, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, मोक्‍याच्या ठिकाणी थांबून पाहणी आणि प्रत्यक्षात चोरट्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्‍या आवळण्याचे काम पोलिसांनी केले होते. याच तऱ्हेने चोऱ्यांचा तपास करणे गरजेचे आहे.

गुन्ह्याची पद्धत सारखीच
शहरात काही दिवसांपासून घडत असलेल्या मंगळसूत्र चोऱ्यांतील 
गुन्ह्याची पद्धत एकच आहे. चोरट्यांकडून एकाच रंगाच्या स्पोर्टस्‌ बाइक वापरणे, त्यांना नंबर प्लेट नसणे व अन्य काही प्रकारचे साम्य आढळून आले आहे. त्यामुळे चोरट्यांच्या एकाच टोळीकडून शहरात विविध ठिकाणी अशा प्रकारे चोरीचे गुन्हे केले जात असल्याची  चर्चा आहे.

घरफोडी, चोरीच्या घटना रोखण्यासाठी दररोज पहाटे पाच ते सकाळी ९ वाजेपर्यंत पोलिस पथक कार्यरत आहे. मंगळसूत्र चोरीच्या घटना थांबविण्यासाठी नाकाबंदी केली जाते. परंतु सर्व ठिकाणी नाकाबंदी करणे किंवा पोलिस ठेवणे तांत्रिकदृष्ट्या शक्‍य होत नाही. 
- बसवराज तेली, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

आमच्या सोसायटीत गाडीची डिकी उघडून चोरी करणाऱ्यास पोलिसांकडे दिले, तर पोलिसांनी त्याला सोडून दिले. तर दुसरीकडे दररोज मंगळसूत्र, सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असूनही पोलिसांचे दुर्लक्ष आहे. या घटनांमुळे महिला असुरक्षित वातावरणात जगत आहेत. महिलांनीही सावधगिरी बाळगून दागिने घालण्याची गरज आहे.
- सीमा मगर, सामाजिक कार्यकर्त्या, घोरपडी पेठ

Web Title: #PunePolice Insecurity in women due to thieves