#PunePollution पावसामुळे शहरातील प्रदूषण पातळीत घट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरताना हवेच्या प्रदूषणामुळे "पुण्यात फिरणं म्हणजे चार सिगारेट ओढणं', असे गेल्या महिन्यात दिसणारे चित्र आता पावसामुळे वेगाने बदलत आहे. जोर धरलेल्या पावसामुळे हवेतील प्रदूषणाच्या पातळीत घट झाली आहे. मात्र, असे असले तरी अजूनही शहरातून फिरताना दिवसभरात दीड सिगारेट ओढण्याएतकी हवा प्रदूषित असल्याचे दिसून येते. 

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरताना हवेच्या प्रदूषणामुळे "पुण्यात फिरणं म्हणजे चार सिगारेट ओढणं', असे गेल्या महिन्यात दिसणारे चित्र आता पावसामुळे वेगाने बदलत आहे. जोर धरलेल्या पावसामुळे हवेतील प्रदूषणाच्या पातळीत घट झाली आहे. मात्र, असे असले तरी अजूनही शहरातून फिरताना दिवसभरात दीड सिगारेट ओढण्याएतकी हवा प्रदूषित असल्याचे दिसून येते. 

देशातील वेगवेगळ्या शहरांच्या हवेतील "रिअल टाइम' प्रदूषण मोजणारी यंत्रणा "शूट! आय स्मोक' या ऍपमधून मिळते. हवेत तरंगणाऱ्या 2.5 मायक्रॉन प्रतिघन मीटर आकाराच्या अतिसूक्ष्म धूलिकणांचा आणि सिगारेटमधून थेट फुफ्फुसात जाणाऱ्या धुराचा संबंध या "ऍप'ने गणितीय पद्धतीने जोडला आहे. त्या आधारावर एक सिगारेट म्हणजे "पीएम 2.5'चे 22 मायक्रॉन प्रतिघन मीटर असे प्रमाण आहे. त्यामुळे दिवसभरात 22 मायक्रॉन प्रतिघन मीटर प्रदूषित हवा श्‍वसनातून फुफ्फुसात जाणे म्हणजे एक सिगारेट ओढण्याच्या बरोबरीचे आहे. हे प्रमाण जूनच्या सुरवातीला दिवसभरात चार सिगारेट ओढण्याच्या बरोबर होते. आता हे प्रमाण दीडपर्यंत कमी झाले आहे. 

पावसाने हवेतील प्रदूषण झाले कमी 
शहरात गेल्या आठवड्यापासून पावसाच्या दमदार सरी पडत आहेत. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवेतील आर्द्रता वाढलेली होती. हवेतील अतिसूक्ष्म धूलिकण आकाशातून जमिनीवर येणाऱ्या पावसाच्या पाण्यात विरघळतात. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होते. 

पावसाळ्यात पुण्यातील हवा चांगली 
पुण्यात पावसाळा वगळता उन्हाळा आणि हिवाळ्यात हवेच्या प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. "शूट! आय स्मोक'च्या निरीक्षणानुसार मे अखेरमध्ये दर दिवसाला नऊ सिगारेट इतके प्रदूषण पुण्यात होते. जूनमध्ये पडलेल्या पावसाने ते चार सिगारेटपर्यंत कमी आले आणि आता ते दीड सिगारेट इतके झाले आहे. त्यामुळे पुण्यात पावसाळ्यात हवा चांगली असते, हेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारेदेखील स्पष्ट होते. 

सूक्ष्म धूलिकण म्हणजे काय? 
"पीएम 10' म्हणजे 10 मायक्रॉनपर्यंत आकार असलेले धूलिकण. एक मिलिमीटरचा एक हजारावा भाग म्हणजे एक मायक्रॉन. 

अतिसूक्ष्म धूलिकण म्हणजे काय? 
"पीएम 2.5' याला अतिसूक्ष्म धूलिकण म्हटले जाते. त्यांचा आकार 2.5 मायक्रॉनपर्यंत असतो. 

Web Title: #PunePollution The reduction of pollution levels in the rain