'गोल्डमॅन'चे अपहरण; निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पुणे - शुक्रवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड येथील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या घरात घुसून चार ते पाच जणांनी अपहरण करून नंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पुणे - शुक्रवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड येथील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या घरात घुसून चार ते पाच जणांनी अपहरण करून नंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाच जणांनी बळजबरीने बाहेर काढले, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. तसेच दगड घालून डोक्‍याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. घटना स्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व फुगे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची शोधपथके रवाना झाली असून पहाटेपर्यंत तरी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

दिघी येथील भारतमाता नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याचा शर्ट तयार केल्याने फुगे जगभर गाजले होते. फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

दत्ता फुगे यांच्या पत्नी सीमा फुगे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. दत्ता फुगे हे स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या हौसेमुळे ते पिंपरीचे गोल्डमॅन म्हणून ओळखले जात. सुमारे साडेतीन किलो सोन्याचा शर्ट बनवून त्यांनी विश्वविक्रम नोंदविल्याने ते एकदम प्रसिद्धीझोतात आले होते. सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वादग्रस्त ठरलेल्या फुगे यांना काही महिन्यापूर्वी पोलिसांनी तडीपारीची नोटीसही बजावली होती.
 

Web Title: Pune's 'Gold Man' Datta Phuge Beaten To Death In Front Of Son