पुण्याचा राज जेईई मेन्समध्ये अव्वल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

जेईई मेन्स परीक्षेत १०० पर्सेन्टाईल मिळाल्याने खूप आनंद झाला. आता जेईई ॲडव्हॉन्स परीक्षेचे वेध लागले आहेत. या परीक्षेतही चांगला स्कोअर व्हावा, हे ध्येय आहे. मला आयआयटी (मुंबई)मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. करायचे आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये परदेशात नोकरीच्या चांगल्या संधी आहेत, तसेच नोकरीची सुरक्षा आहे, त्यामुळे ही विद्याशाखा महत्त्वाची वाटते.
- राज आर्यन अग्रवाल, विद्यार्थी (१०० पर्सेन्टाईल) 

पुणे - देशातील नावाजलेल्या आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेचा भरपूर अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी दहावीनंतर राजस्थानमधील कोटा, हैदराबाद गाठतात. मात्र, पुण्यातील राज आर्यन अग्रवाल या विद्यार्थ्याने कोणत्याही खासगी शिकवणीचे पर्याय न स्वीकारता अकरावीत चक्क महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेऊन जेईई मेन्समध्ये १०० पर्सेन्टाईल मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. 

पुणे महानगरपालिकेच्या सहकारनगर येथील राजीव गांधी ॲकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये राज शिक्षण घेत आहे. त्याचे आठवीपर्यंतचे शिक्षण मॉस्कोमध्ये झाले आहे. त्यानंतर त्याचे पालक पुण्यात आले. त्या वेळी ॲमनोरा स्कूलमध्ये त्याने नववीला प्रवेश घेतला.  मात्र दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्याने अकरावीसाठी महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंगमध्ये प्रवेश घेतला.

‘‘अन्य शाळा, महाविद्यालयांच्या तुलनेत महापालिकेच्या या शाळेत चांगल्या दर्जाचे कोचिंग मिळते. या शाळेने विविध नामांकित संस्था, कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. म्हणून दहावीपुढील शिक्षणासाठी मी या शाळेचा पर्याय निवडला,’’ असे राज आर्यन याने सांगितले.

जेईई मेन्स परीक्षेत १०० पर्सेन्टाईल मिळाल्याने खूप आनंद झाला. आता जेईई ॲडव्हॉन्स परीक्षेचे वेध लागले आहेत. या परीक्षेतही चांगला स्कोअर व्हावा, हे ध्येय आहे. मला आयआयटी (मुंबई)मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. करायचे आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये परदेशात नोकरीच्या चांगल्या संधी आहेत, तसेच नोकरीची सुरक्षा आहे, त्यामुळे ही विद्याशाखा महत्त्वाची वाटते.
- राज आर्यन अग्रवाल, विद्यार्थी (१०० पर्सेन्टाईल) 

Web Title: Pune's Raj Agarwal tops the JEE Mains exam