नाटक सरले मेळावे उरले

प्रसाद पाठक
गुरुवार, 31 मे 2018

सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या पुण्याचा विकास चौफेर झाला. पण, रसिक पुणेकरांची सांस्कृतिक गरज बनलेल्या नाट्यगृहांकडे दुर्लक्षच झाले आहे. महापालिकेने नाट्यगृह म्हणून ज्यांची उभारणी केली, त्यात अनेक त्रुटी राहिल्याने त्यांचा वापर प्रामुख्याने राजकीय कार्यक्रमांसाठी होऊ लागला आहे. शहरातील या नाट्यगृहांचा आजपासून घेतलेला वेध. 

पुणे - पुणे शहराच्या पूर्व भागातील प्रेक्षकांना नाटके पाहायला मिळावीत. या उद्देशाने गंज पेठेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले. परंतु, नाट्यकर्मींनीच पाठ फिरविल्याने तेथे नाटकाचे प्रयोग होत नाहीत. मात्र, सवलतीच्या दरात उपलब्ध होत असल्याने सामाजिक, शैक्षणिक संस्था व राजकीय पक्षांच्या मेळाव्यांसाठी स्मारकाचा वापर होत आहे.

स्मारकातील नाट्यगृह ४७५ आसनक्षमतेचे आहे. तेथेच कलादालन असून, नागरवस्ती विभागाचे कार्यालयदेखील आहे. मेकअप रूम, उपाहार गृह, प्रशस्त वाहनतळाची सोय आहे. पण, तेथे नाटकाचे प्रयोग होत नाही. कलादालनाच्या सुशोभीकरणाचे काम दोन-अडीच महिन्यांपासून चालले आहे. 

तीन तासांसाठी खासगी संस्थांना अठरा हजार रुपये भरावे लागतात. धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्या परवानगीने ४१३० रुपये एवढ्या सवलतीत तीन तासांसाठी नाट्यगृह वापरायला मिळते. त्यामुळे नाट्यगृहाचा वापर नाटकाऐवजी अन्य कार्यक्रमांसाठी अधिक होतो. त्यातच तेथे वर्षभरापासून पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम प्रलंबित आहे. महिन्याला लाखो रुपयांचे वीजबिल येते. त्या तुलनेत म्हणावे तसे उत्पन्न नाही. बहुतांश वेळेला नाट्यगृह रिकामेच असते. याबाबत व्यवस्थापक साईनाथ केंगार म्हणाले, ‘‘पाइपलाइनबाबत महापालिकेला कळविले आहे. मात्र, येथे नाटकांचे प्रयोग होत नाहीत. आसपासच्या लोकवस्तीमुळे नाटक कंपन्या येथे प्रयोग करण्यात उत्सुक नसाव्यात. सुरक्षारक्षकांपैकी पाच पुरुष आहेत, तर सहा महिला आहे. दोन महिन्यांपूर्वी महिला सुरक्षारक्षक नेमले आहेत.’’ 

बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे नाटकांचे प्रयोग होतात. कारण त्या नाट्यगृहांच्या आसपास नाटकांना पसंती दर्शविणारा प्रेक्षकवर्ग आहे. परंतु, काही नाट्यगृहांच्या आसपास नाटकाला पोषक असा प्रेक्षकवर्ग नसतो. प्रेक्षकवर्ग नसेल म्हणून त्या ठिकाणी नाटकांचे प्रयोग होत नसावेत.
-संदीप खरे, कवी

स्थानिक नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि कलाकारांनी पुढाकार घेतला, तर पूर्व भागातील नाट्यगृहांमध्येही दर्जेदार नाटके होतील. परंतु, त्यासाठी कलाकारांची राहण्याची सोय, नाट्यगृहाची देखभाल दुरुस्ती, नियमित पुरवायच्या सेवासुविधांची पूर्तता महापालिकेने करावी. 
-मदन गिजरे, प्रेक्षक

वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनाची  काय आहे अवस्था?  वाचा उद्याच्या भागात

Web Title: PuneTheatre issue