#PuneTraffic : होता वाहतूक कोंडी, शाळाच म्हणते मारा दांडी! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

वाहतूक कोंडीचा त्रास रोजच सहन करावा लागत आहे. यामुळे मुलांनाही अनेकदा शाळेत पोचण्यास, तसेच घरी येणास उशीर होतो. पालक चिंतेत पडतात. वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर उपाययोजना करावी. 
- प्रदीप सातव, सागर पाटील, पालक 

वाघोली -  मोर्चे, आंदोलन, बंद किंवा आपत्कालीन परिस्थितीत शाळा बंद ठेवल्याचे आपण अनेकदा ऐकले; मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद ठेवल्याची वेळ वाघोलीतील लेक्‍सिकॉन स्कूलवर आज आली. श्रावणी सोमवारच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने शाळेने सुटी जाहीर केली. पालकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. वाघोलीतील वाहतूक कोंडीबाबत "सकाळ'ने वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. 
#PuneTraffic

वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौक ते केसनंद फाटा या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होते. या भागातून दर तासाचा किमान सात हजार वाहानांची ये-जा होत असते. त्यातच बंद सिग्नल यंत्रणा, बेशिस्त वाहतूक, अरुंद रस्ता यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्यातच श्रावणी सोमवारनिमित्त वाघेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी असते. या कोंडीने त्रस्त झालेल्या लेक्‍सिकॉन स्कूलने सुटी जाहीर करून, तसे ई-मेल सर्व पालकांना पाठविले. कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत येताना, तसेच सायंकाळी घरी जाताना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे शाळेने म्हटले आहे. 

कोंडी कोठे - वाघेश्वर मंदिर चौक, आव्हाळवाडी ते केसनंद फाटा 
केव्हा - सकाळी 7.30 ते रात्री 11 
परिणाम - किमान दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा 
कारण - अरुंद रस्ता, बंद सिग्नल यंत्रणा, बेशिस्त वाहतूक, अतिक्रमणे, श्रावणी सोमवारमुळे वाघेश्‍वर मंदिरात गर्दी झाल्याने कोंडीत वाढ 

वाहतूक कोंडीचा त्रास रोजच सहन करावा लागत आहे. यामुळे मुलांनाही अनेकदा शाळेत पोचण्यास, तसेच घरी येणास उशीर होतो. पालक चिंतेत पडतात. वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर उपाययोजना करावी. 
- प्रदीप सातव, सागर पाटील, पालक 

वाघोलीत वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. श्रावणी सोमवारमुळे मंदिरात होणारी गर्दी व वाहतूक कोंडीची शक्‍यता लक्षात घेऊन सुटी देण्याचा निर्णय घेतला. वाहतूक कोंडीच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
- गुरू सिमरन कौर, प्राचार्या, लेक्‍सिकॉन स्कूल 

Web Title: PuneTraffic School closed due to traffic jam