पंजाबी-मराठी नाते अजून घट्ट होईल - सुखदेवसिंग सिरसा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

पंजाबी कवितेचे विश्‍व देशभक्तीने ओतप्रोत भरलेले होते. काही काळानंतर कविता बदलत गेली. प्रेम, दु:ख, विरह अशा विषयांपासून अनेक सामाजिक विषयांवर पंजाबी कवितेने भाष्य केले. वाचकांना नवा विचार दिला; पण नवनवी माध्यमे येत असल्यामुळे कवितेचा समाजावर पडणारा पूर्वीसारखा प्रभाव आज राहिला नाही, ही खंत मनात दाटून आहे.
- डॉ. लखविंदर जोहाल, कवी

पुणे - 'मराठी आणि पंजाबी भाषेत अनुवादाच्या माध्यमातून एकमेकांच्या विचारांचे आदान-प्रदान होत आहे. हा "सिलसिला' असाच सुरू राहिला, तर केवळ अनुवादाच्या बळावर पंजाबी-मराठी नाते अजून घट्ट होईल,'' असे मत पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुखदेवसिंग सिरसा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

"सरहद'तर्फे आयोजित पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनात "पंजाबी भाषा, साहित्य, संगीत' या विषयावरील चर्चासत्रात सिरसा बोलत होते. "सकाळ माध्यम समूहा'चे मुख्य संपादक श्रीराम पवार हे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. अनुवादक तेजवंतसिंग मान, जगदीश कौर वाडिया, कथाकार बलदेवसिंग, कवी डॉ. लखविंदर जोहाल, वंदना शुक्‍ला, गझलकार जगविंदर जोधा, डॉ. कमल भल्ला, डॉ. लाभसिंग खिवा हे पंजाबीतील मान्यवर लेखक यात सहभागी झाले होते.

सिरसा म्हणाले, ""पंजाबीत भक्ती आणि सुफी संत साहित्याची मोठी परंपरा आहे. ती समजून घेतल्याशिवाय खरा पंजाब समजू शकणार नाही. पंजाब हा कधीच एका भाषेचे राज्य राहिलेला नाही. अनेक भाषिक लोक ये-जा करत असतात. पंजाबी लेखकांनीसुद्धा पंजाबीशिवाय संस्कृत, हिंदी, पारसी अशा विविध भाषेत लेखन केले. त्यामुळे पंजाबचे सौंदर्य नानाविध भाषेत पसरलेले आहे. आम्हा पंजाबी लोकांना संत नामदेव जेवढे माहिती आहेत, तेवढेच अनेक मराठी लेखकही माहिती आहेत. नामदेव ढसाळ, बाबूराव बागूल, दया पवार असे कितीतरी लेखक-कवींचे साहित्य पंजाबीत अनुवादित झाले आहे.''

आपण बहुभाषिक व्हायला हवे
'इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि जागतिकीकरणामुळे भारतीय भाषा मरतील, अशी भीती व्यक्त केली जाते; पण भाषा मरतील, असे मला अजिबात वाटत नाही. करोडो लोक भारतीय भाषा बोलतात. प्रत्येकाची भाषेबाबतची अस्मिता आहे. मी गावागावांत जातो, तिथल्या लोकांना भेटतो, त्या वेळी मला ही अस्मिता, भाषेबद्दलचे प्रेम दिसते. त्यामुळे भारतीय भाषेची काळजी करण्याचे काही कारण नाही,'' असे मत श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. मातृभाषेतून शिकणे जितके गरजेचे आहे तितकेच इंग्रजी येणे हेही महत्त्वाचे आहे. याशिवाय एखादी तरी परकीय भाषा आपण शिकायला हवी. भारतीय भाषेत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे. ते त्याच प्रमाणात इतर भारतीय भाषेत अनुवादित व्हायला हवे, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.

काही देशांत इंग्रजी भाषेतून अजिबात व्यवहार होत नाहीत. आपापल्या भाषेला ते महत्त्व देतात. तरीदेखील त्या देशाची प्रगती होताना दिसत आहे. अशी उदाहरणे आपल्यासमोर असताना आपण आपल्या भाषेला मागे टाकून इंग्रजी भाषेला पुढे आणले आहे, ही चिंताजनक स्थिती आहे.
- तेजवंतसिंग मान, अनुवादक

Web Title: Punjabi-Marathi relationship will still tight