पुरंदर विमानतळाच्या विरोधात चक्काजाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पारगाव मेमाणे - पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थगिती मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा देत बाधित गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 6) चक्काजाम आंदोलन केले. पारगाव मेमाणे, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण या गावांतील शेतकऱ्यांनी मुलेबाळे व गुराढोरांसह रस्त्यावरच संसार थाटला. जेजुरी-उरुळी कांचन, सासवड-सुपा, सासवड-यवत, झेंडेवाडी - पांडेश्‍वर रस्त्यावरील वाहतूक शेतकऱ्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत रोखली.

विमानतळाची एक वीटही लावून देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दिला. जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे, शेतकरी सेनेचे बाबा जाधवराव, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, गंगाराम जगदाळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. रास्ता रोकोमुळे झेंडेवाडीमार्गे पुण्याकडे, तसेच सासवड व यवतकडे जाणारी तसेच तालुक्‍याच्या पूर्वेकडील गावांची वाहतूक विस्कळित झाली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

नायब तहसीलदार धनंजय जाधव, जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या आवाहनानंतर दुपारी तीननंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 13 ऑगस्ट रोजी सासवड तहसीलदार कचेरीवर बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा सरपंच सर्जेराव मेमाणे, जितेंद्र मेमाणे यांनी दिला.

वनपुरीचे सरपंच नामदेव कुंभारकर, उदाचीवाडीचे सरपंच संतोष कुंभारकर, विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे संतोष हगवणे, विठ्ठल मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग मेमाणे, मच्छिंद्र कुंभारकर, नाथा कुंभारकर, पंढरीनाथ कुंभारकर आदींनी आंदोलनाचे नियोजन केले.

गाव व शाळा बंद
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाव, तसेच शाळा बंद ठेवण्यात आली होती.

शेतकऱ्यांनी जागरण-गोंधळ घालून राज्य सरकारचा निषेध केला.
पारगावातील शेतकऱ्यांनी रस्त्यातच बैलगाड्या सोडून दिल्या. महिलांनी दगडाच्या चुली मांडत स्वयंपाक केला. मुलांनी शाळेकडे पाठ फिरवत रस्त्यावरच अभ्यास केला.

Web Title: Purandar Airport Oppose Chakkajam Agitation