पुरंदरला खुल्या सभापतिपदाने पेच सुटला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

सासवड : पुरंदर तालुका पंचायत समितीचे सभापतिपद खुले झाल्याने बहुतेक पक्षांपुढील महत्त्वाचा पेच पहिल्या अडीच वर्षांसाठी तरी सुटला आहे. मागील वेळी हे पद अगोदर नागरिकांचा मागास प्रवर्ग व नंतर महिलांसाठी राखीव होते. त्यामुळे यंदा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण पुन्हा पडते का पद खुले होते, याकडे सर्वांचे लक्ष होते. आता सभापतिपद खुले झाल्याने पहिला दावा खुल्या वर्गातील पुरुष जसा करणार आहेत, तसेच इतर कोणत्याही जागेवर निवडून आलेल्या व्यक्तीस हे पद मिळण्यात कोणतीही अडचण राहणार नाही. त्यामुळे पक्षीय संघटनेसमोरील पेच सुटल्याचे मानले जात आहे.

सरत्या तालुका पंचायत समितीच्या सभागृहात पक्षीय बलाबल विभिन्न होते. कोणत्याही पक्षास बहुमत नव्हते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे दोन जिल्हा सदस्य असतानाच तीन पंचायत समिती सदस्य होते. मनसेकडे एक जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य आणि कॉंग्रेसकडे एक जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य होते. शिवसेनेकडे एकमेव पंचायत समिती सदस्यपद होते. सरत्या पंचवार्षिकमध्ये सभापतिपद पहिली अडीच वर्षे नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव होते. त्या वेळी राष्ट्रवादी व मनसे युतीत मनसेच्या सुजाता दगडे या तुकाराम शिंदे (कॉंग्रेस) यांच्या विरोधात पाच विरुद्ध तीन मतांनी विजयी झाल्या होत्या; तर उपसभापतिपदी माणिक झेंडे (राष्ट्रवादी) हे बिनविरोध निवडले गेले होते. पुढील अडीच वर्षे महिला राखीव सभापतिपद झाल्याने दीड वर्ष गौरी कुंजीर (राष्ट्रवादी) व एक वर्ष अंजना भोर (राष्ट्रवादी) या बिनविरोध निवडल्या गेल्या. उपसभापतिपदी अनिता कुदळे (मनसे) या अडीच वर्षे कायम राहिल्या.

आठपैकी आता दिवे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग, माळशिरस गण सर्वसाधारण स्त्री राखीव, बेलसर गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, भिवडी गण सर्वसाधारण स्त्री राखीव, वीर गण सर्वसाधारण स्त्री राखीव, नीरा शिवतक्रार गण अनुसूचित जाती राखीव आहेत. त्यामुळे नव्या पंचवार्षिकमध्ये पुढील अडीच वर्षे काय आरक्षण निघणार त्यावर नव्या सदस्यांचे पुन्हा लक्ष असणार आहे. आता मात्र, सर्व पक्षांकडे सभापतिपदासाठी पर्याय उपलबध असतील; मात्र, बहुमत किंवा युत्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Web Title: purandar sabhapati seat for open category