शेतजमीन खरेदीसाठीही कर्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

राज्यातील एकमेव बॅंक - थोरात 
अनेक बॅंका शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेती अवजारे आणि शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी मध्यम मुदत कर्ज आणि शेतीपूरक जोडधंद्यासाठी कर्ज देत असतात. परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी शेजारील जमीन खरेदीसाठी कोणतीही बॅंक कर्ज देत नाही. सध्या जमीन खरेदीसाठी कर्ज देणारी जिल्हा बॅंक आहे, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

पुणे - शेतकऱ्यांना पिकांसाठी, शेती अवजारे खरेदी किंवा शेतीपूरक जोडधंदा सुरू करण्यासाठी विविध बॅंका कर्जपुरवठा करतात. पण, एखादी बॅंक चक्क शेजारची जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देतेय, म्हटलं तरी, कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. परंतु, हो, हे शक्‍य असल्याचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दाखवून दिले आहे. या बॅंकेने चक्क शेतजमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणारी नवी योजना सुरू केली.

दरम्यान, सात महिन्यांत बारामती व दौंड तालुक्‍यांतील १७ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला. यानुसार सर्व शेतकऱ्यांनी मिळून, त्यांच्या पूर्वीच्या जमिनीच्या शेजारची विक्रीस निघालेली १८ एकर २४ गुंठे जमीन कर्जातून खरेदी केली. यासाठी बॅंकेने शेतकऱ्यांना दोन कोटी ७६ लाख ३९ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. यापैकी बारामती तालुक्‍यातील १३ शेतकऱ्यांना दोन कोटी ३८ लाख ९९ हजार रुपयांचे तर, दौंड तालुक्‍यातील चार शेतकऱ्यांना ३७ लाख ४० हजार रुपयांचे कर्जवाटप केले. 

जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कर्ज योजनेचा निर्णय घेतला. यानुसार या आर्थिक वर्षापासून योजनेची अंमलबजावणी सुरू केली. एप्रिल ते ऑक्‍टोबर २०१९ दरम्यान हे कर्जवाटप केले. बागायती जमिनीच्या खरेदीसाठी किमान पाच लाख आणि जिरायतीच्या खरेदीसाठी किमान दोन लाख आणि 
दोन्ही प्रकारच्या जमीन खरेदीसाठी कमाल २५ लाखांचे कर्ज देण्यात येत आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: purchasing loan for Agriculture land