बोहरी आळीमध्ये "कार्ड पेमेंट'ने खरेदी !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - ""आपल्या मुलाच्या वाढदिवसाकरिता किरकोळ सजावटीचे सामान खरेदी करायचे होते. बोहरी आळीमध्ये स्वस्तात आणि भरपूर व्हरायटीचे सामान मिळते, त्यामुळे तिथे जाऊनच खरेदी करण्याचा मानस होता; पण सुटे पैसे नव्हते, त्यामुळे तिथले दुकानदार "कार्ड पेमेंट' घेतील का? याबाबत साशंक होते. पण, दुकानमालकाने कार्डद्वारे पैसे घेतल्यामुळे मला धक्काच बसला! बोहरी आळीमध्ये "कार्ड पेमेंट'द्वारे सामान खरेदी करू शकेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते!'' 

ही प्रतिक्रिया आहे एका सामान्य गृहिणीची. पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर व नवीन नोटांचा पुरेसा पुरवठा बाजारात अद्याप झालेला नसल्यामुळे पुणेकरांनी "प्लॅस्टिक मनी'च्या वापरास प्राधान्य दिले आहे. यापूर्वी विचारसुद्धा केला नाही अशा ठिकाणी "प्लॅस्टिक मनी'चा पर्याय अवलंबला जात आहे. क्रेडिट असो की डेबिट कार्ड, व्यवहार पूर्ण करण्यासाठी सध्या तरी या शिवाय चांगला पर्याय नागरिकांकडे उपलब्ध नाही. 

पेट्रोल पंप, हॉटेल, मॉल, दुकाने अशा ठिकाणी कार्डद्वारे पैसे देणेच सोयीचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, अनेक ठिकाणी कार्डद्वारे पैसे देणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त 20 रुपये शुल्क दुकानदारांकडून आकारले जात आहे. त्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

""कार्डद्वारे पैसे दिल्यानंतर ते पैसे थेट दुकानदाराच्या खात्यातच जमा होत आहेत. सर्व व्यवहारांची नोंद आपोआपच ठेवली जात आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांना त्यांचे बहुतांश व्यवहारांच्या नोंदी सरकार दरबारी सादर कराव्या लागतील आणि पर्यायाने कर अधिक प्रमाणात भरावा लागणार आहे. ही चांगली गोष्ट घडत असली तरी काही व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क लावले जात आहे. हा भार नागरिकांवर का लादला जात आहे,'' असा सवाल श्रीराम देशपांडे याने विचारला. ""वाद घातला की काही व्यावसायिक अतिरिक्त शुल्क लावत नाही. त्यामुळे लोकांनी आपल्या हक्काबद्दल जागरूक राहिले पाहिजे,'' असेही तो म्हणाला. 

शनिवारी रात्री कार्ड पेमेंट सेवा विस्कळित 
पाचशे व हजारच्या नोटा हॉटेलमध्ये स्वीकारल्या जात नसल्यामुळे अनेकांनी कार्ड जवळ बाळगून शनिवारी रात्री "हॉटेलिंग' केले. मात्र, शहरातील काही भागांमध्ये "कार्ड पेमेंट' सेवा विस्कळित झाल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. शनिवारी काही तासांपुरते "नेटवर्क' गायब झाले होते. त्यामुळे ""खात्यात पैसे आहेत, नोटा आहेत कार्डही आहे, पण तरीही पैसे देऊ शकत नाही'' अशी परिस्थिती ओढवली होती. विशेषतः तरुण-तरुणींना या "नेटवर्क फेल'चा मोठा फटका बसला. "कार्ड पेमेंट' सेवा विस्कळित झाल्यामुळे तरुणाईने त्याचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला.

Web Title: purching by card payment