प्रकाशयोजनेचा विचार लेखनात होण्याची गरज - प्रेमानंद गज्वी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नाट्यमांडणी प्रभावी होण्यासाठी दिग्दर्शनापासून प्रकाशयोजनेचाही विचार लेखनातच केला पाहिजे. तो होताना दिसत नाही, असे मत नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.

पुणे - नाट्यमांडणी प्रभावी होण्यासाठी दिग्दर्शनापासून प्रकाशयोजनेचाही विचार लेखनातच केला पाहिजे. तो होताना दिसत नाही, असे मत नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. "कलोपासक'चे अध्यक्ष अनंत निघोजकर, परीक्षक नितीन धंदुके, अश्विनी देशपांडे, दिगंबर निघोजकर, प्रसाद मिरासदार आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम करंडकविजेत्या "लाली' या एकांकिकेचा प्रयोग सादर केला.

"आपल्याकडचे लेखक आणि लेखन चाकोरीबद्ध होत आहे. त्यामध्ये जगण्यातील व्यामिश्रता येत नाही. ती येण्यासाठी लेखनात निष्ठा असावी लागते. एकांकिका स्पर्धांमधून वेगवेगळे विषय मांडणारे लेखक कालांतराने चित्रपटात, नाटकात कुठेच दिसत नाहीत. ते जातात कुठे? अशी खंत गज्वी यांनी व्यक्त केली.

एकांकिका लिहिणारे लेखक पुढेही प्रवाहात राहावेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अभिनयाबरोबर त्यातील तत्त्व या घटकाचा विचार होत नाही. तसेच, आपल्याकडे लेखकाला फारसे मूल्य दिले जात नाही. लेखक हा मूळ असतो,' असे त्यांनी सांगितले.

अश्विनी देशपांडे यांनी विचार मांडले. यंदा चाळीस विद्यार्थी लेखक होते, याचा आनंद वाटतो. मात्र, त्यांनी विषयाच्या आणखी खोलात जाण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. एकांकिका सिनेमाच्या पद्धतीने नाही, तर नाट्याच्याच पद्धतीने होण्याची गरज आहे, असे मत दिगंबर निघोजकर यांनी व्यक्त केले.

संहितेनुसारच प्रयोग
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या परीक्षकांनी यंदा अनेक प्रयोगांचे सादरीकरण संहितेपेक्षा वेगळे केल्याची तक्रार झाली आहे. त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त संहितेनुसारच प्रयोग करावा लागेल, असा नियम "पुरुषोत्तम'कडून कटाक्षाने पाळला जाईल, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purushottam karandak Premanand gajvi