पुष्पक वाहिनीकडे दुर्लक्ष

महेंद्र बडदे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे - पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्याकरिता उपयुक्त ठरणारी ‘पुष्पक वाहिनी’ या सेवेकडे महापालिका प्रशासन आणि पीएमपीचे दुर्लक्ष होत आहे. या सेवेसाठी असलेल्या तीनपैकी एकच शववाहिका सुरू आहे. 

पुणे - पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्याकरिता उपयुक्त ठरणारी ‘पुष्पक वाहिनी’ या सेवेकडे महापालिका प्रशासन आणि पीएमपीचे दुर्लक्ष होत आहे. या सेवेसाठी असलेल्या तीनपैकी एकच शववाहिका सुरू आहे. 

पीएमटीच्या संचालक मंडळाने २४ वर्षांपूर्वी ‘पुष्पक वाहिनी’ सेवा सुरू केली होती. पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्याकरिता पीएमटीने बसच्या रचनेत बदल करून वाहन उपलब्ध करून दिले होते. ही सेवा सोयीची ठरत असल्याने या वाहनांची संख्या तीनपर्यंत गेली होती. सध्या ‘पीएमपी’कडून चार ‘पुष्पक वाहिनी’ची सेवा दिली जात होती. त्यापैकी एक वाहिनी ही पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी दिली गेली आहे. एक वाहिनी दुरुस्तीमुळे बंद, तर एक वाहिनी प्रादेशिक परिवहन परवान्याचे नूतनीकरण होऊ शकत नसल्याने बंद आहे. 

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना या सेवेतून मदतच केल्यासारखे आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक शववाहिका घेतली; परंतु ती पीएमपीकडे न देता अग्निशामक दलाकडे सोपविली आहे. पुष्पक वाहिन्यांची संख्या वाढविली पाहिजे, असे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी सांगितले. दरम्‍यान, याबाबत संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

क्षेत्रीय कार्यालयात सेवा असावी
पुष्पक वाहिनीच्या सेवेसाठी पीएमपीकडे प्रतिदिन आठ ते दहा ‘कॉल’ येतात. एकच वाहिनी उपलब्ध असल्याने काहींना ही सेवा उपलब्ध होत नाही. त्यांना खासगी शववाहिनीचा उपयोग करावा लागतो. खासगी शववाहिनीचा खर्च हा सर्व सामान्यांना परवडत नाही. मृत व्यक्तीचे घर ते स्मशानभूमी आणि तेथून परत घर अशी सेवा असेल तर ती वर्दी पूर्ण करण्यास दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. एकच वाहन असल्याने इतरांना ही सेवा उपलब्ध होत नाही. यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक पुष्पक वाहिनी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

Web Title: Pushpak Vahini Ignore