वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवावा

वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवावा

शहरातील उच्चभ्रू सोसायटी, बंगले आणि बैठी घरे असलेल्या प्रभागातील रस्ते, पदपथ, पावसाळी गटारे, रस्त्यांवरील दिव्यांची कामे बहुतांशी झाली आहेत. कचरा आणि पाण्याचा प्रश्‍नही या प्रभागात कुठेच जाणवत नाही. प्रभागातील लोकवस्तीच्या परिसरात अतिक्रमणांना थारा मिळालेला नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी चांगली कामे केल्याचे विरोधकही उघडपणे सांगतात. मात्र, पौड रस्त्याचा काही भाग आणि गुजरात कॉलनीच्या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविला जावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 

कोथरूड परिसरातील गुजरात कॉलनी, आयडियल कॉलनी, मयूर कॉलनी अशा अनेक जुन्या सोसायट्यांचा प्रमुख भाग आणि सिटीप्राइड चित्रपटगृहाचा परिसर, थोरात उद्यान, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सुतार दवाखान्याचा प्रभागात समावेश आहे. बंगले आणि सोसायट्यांचा बहुतांश भाग या प्रभागात येतो. कचऱ्यापासून आरोग्यापर्यंत आणि रस्त्यांपासून पाणीपुरवठ्यापर्यंत अनेक समस्यांचे निराकरण करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आले आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी नव्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळेच विरोधकांनीही प्रभागात बऱ्याचअंशी विकामकामे होत असल्याचे मान्य केले आहे. 

प्रभागात "एसएनडीटी‘ पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा केला जात असला, तरी काही भागांत अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याची समस्या होती. ती सोडविण्यासाठी संपूर्ण प्रभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी सल्लागार नेमून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पाण्याची समस्या सुटली आहे. कचऱ्याचा प्रश्‍न सोडवून प्रभाग कंटेनरमुक्त केला आहे. मोठ्या आणि गल्ली-बोळांतील रस्त्यांवर घंटागाडीची व्यवस्था झाली आहे. कचरा वर्गीकरण करूनच संकलित केला जातो. त्यामुळे रस्त्यांवर कचरा दिसत नाही. ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याच्या वर्गीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. 

त्याचबरोबरच महिला स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यात आली आहे. प्रभागातील ज्या ठिकाणी चांगले रस्ते नव्हते, त्या ठिकाणी कॉंक्रीटचे रस्ते करण्यात आले आहेत. त्यामुळे हे रस्ते अनेक वर्षे टिकतील, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत. नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेऊनच विकासकामे केली जात असल्याने फारशा समस्या जाणवत नसल्याचा दावा लोकप्रतिनिधींचा आहे. प्रभागातील सर्व कामे नागरिकांच्या गरजेनुसारच झाल्याचेही ते सांगतात. विकासकामे होत असली, तरी या प्रभागात शिवाजी पुतळा, सुतार दवाखाना आणि गुजरात कॉलनी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवायला हवी, अशी नागरिकांची मागणी आहे. ज्या काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत, तीही काढण्याची गरज त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान प्रदीर्घ काळ अर्धवट अवस्थेत पडून आहे. 

पृथ्वीराज सुतार (नगरसेवक, शिवसेना) 

प्रभागातील सर्वच भागांत सिमेंट-कॉंक्रीटचे रस्ते केले असून, सेवावाहिन्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रस्त्यांची खोदाई होणार नाही. रस्त्यांलगत पावसाळी गटार असल्याने पाणी साचण्याच्या घटना घडत नाहीत. सल्लागाराच्या माध्यमातून प्रभागातील पाण्याची गरज, त्याची उपलब्धता याचा अभ्यास केला असून, त्यानुसार पाणीपुरवठा नियोजन केले आहे. त्यासाठी नव्याने मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. पाणीकपात असतानाही नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा झाला. सोसायटी, बंगले आणि बैठ्या घरांमधील कचरा रोजच्या रोज गोळा केला जातो. त्यावर देखरेख करणारी यंत्रणा आहे. झाडांमुळे निर्माण होणारा कचराही उचलण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी उद्यानांमध्ये "ट्रॅक‘ आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कलामंदिर उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रभागातील रस्ते अतिशय चांगल्या दर्जाचे आहेत. त्याची वेगवेगळ्या पातळ्यांवर दखलही घेण्यात आली आहे. ज्या-ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहेत. गुजरात कॉलनीत वाहतूक नियंत्रक यंत्रणा (सिग्नल) उभारली आहे. 

मोनिका मोहोळ (नगरसेविका, भारतीय जनता पक्ष) 

प्रभागातील नागरिकांच्या नेमक्‍या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पापूर्वी त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यातून काही नव्या योजना मांडल्या आहेत. पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी त्या-त्या भागातील लोकसंख्येचा विचार करून जलवाहिन्या बदलल्या आहेत. प्रभाग कंटेनरमुक्त केला आहे. त्यामुळे कचरा दिसत नाही. नागरिकांच्या, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभागातील काही ठिकाणी "सीसीटीव्ही‘ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 

प्रभागात प्रदीर्घ काळ अर्धवट असलेले पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मयूर कॉलनीतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. परिसरातील वाहतूक कोंडी ही समस्या कायमच असते. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

जितेंद्र भेलके (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 

सर्व भागांत अपेक्षित विकासकामे झाली आहेत. मात्र, त्यांचा दर्जा राखण्याची गरज असताना तसे झालेले नाही. त्यामुळे नवे रस्ते खराब होत आहेत. विशेषत: नव्याने केलेले कॉंक्रीटचे रस्ते खचलेले आहेत. वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून, त्याकडे फारशा गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शिवाजी पुतळा, सुतार दवाखाना आणि गुजरात कॉलनीत ही समस्या भेडसावते. वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांची गैरसोय होते. पाण्याचा प्रश्‍नही अजून पूर्णपणे सुटलेला नाही. पाणीकपात असताना अनेक सोसायट्यांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी आहेत. सांडपाणी वाहिन्या बदलण्याची गरज आहे. मात्र, अद्याप ते केलेले नाही. 

दीपाली पायगुडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 

नागरिकांना आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र, काही भागांतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. प्रभागातील सर्व भागातील नागरिकांना पाणी पुरेसे मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने योजना आखल्या जात नाहीत. कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. मात्र, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या बदलण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र योजना राबविली पाहिजे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com