#WomenSafety पुण्यात महिला सुरक्षित आहेत का? विनयभंगाच्या तीन घटना

crime_wome.jpg
crime_wome.jpg

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात महिला व तरुणींचा विनयभंग करण्याच्या तीन घटना शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटेच्या सुमारास डेक्कन व शिवाजीनगर येथे घडल्या. त्यापैकी एका घटनेत उद्यानामध्ये तरुणींसमोर अश्‍लील चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणामध्ये डेक्कन व शिवाजीनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

शिवाजीनगर येथील पहिल्या घटनेबाबत जनवाडी येथे राहणाऱ्या 23 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुकुंद सुरेश सोळंके (वय 27, रा. गणेशनगर, औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादी या पतीसमवेत रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलिस वसाहतीजवळील मस्जिदसमोरील रस्त्याने जाताना थांबल्या. त्यावेळी दारु पिऊन तेथून जात असलेला मुकुंद सोळंके याने फिर्यादीच्या कमरेवरुन हात फिरवीत मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या भावना दुखाविल्या. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीस पाहून घेण्याची धमकीही त्यांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी त्यास तत्काळ अटक केली. 

दरम्यान या घटनेनंतर विनयभंगाची दुसरी घटना देखील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच घडली. याप्रकरणी सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या त्यांच्या मैत्रीणीसमवेत रविवारी पहाटेच्या सुमारास सुमारास संचेती रुग्णालयाजवळून गणेशखिंड रस्त्यावरील सेंट्रल मॉलच्या दिशेने त्यांच्या दुचाकीवरून जात होत्या. दरम्यान चारजणांनी त्यांच्या कारमधून फिर्यादी यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या दुचाकीसमोर आपली कार आडवी लावून त्यांना अश्‍लील शिवीगाळ करीत अश्‍लील इशारे व वर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांकडून कारचा क्रमांक शोधण्यात आला असून आरोपींचा माग काढला जात असल्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सांगितले. 

औंध येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून करणसिंह महावीर कुंजडा (वय 29, रा. आयरीन साईट, प्रभात रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांची मैत्रीण प्रभात रस्त्यावरील जॉगर्स पार्क येथे रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता गप्पा मारत होत्या. त्यावेळी आरोपी हा तेथे आला, त्याने दोघींसमोर उभा राहून अश्‍लील चाळे केले. दरम्यान, तरुणींनी त्यांच्या मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती राजेशिर्के करीत आहेत. 

"महिला, तरुणींबाबत पुणे पोलिस कायम संवेदनशील आहे. त्यादृष्टीने पोलिस ठाण्यांच्या पातळीवर महिलांबाबतच्या गुन्ह्यांची तातडीने दखल घेतली जाते. तसेच प्रत्येक घटनेचा तपासही तत्काळ पुर्ण केला जातो.''
- सुहास बावचे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com