कुकडी प्रकल्पामुळे रब्बी हंगामातील सिंचनाची चिंता दूर 

रवींद्र पाटे
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कुकडी प्रकल्पात 25 टीएमसी (81.98 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी ऑक्‍टोबरअखेर प्रकल्पात 25.8 टीएमसी (84 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. या वर्षी दोन महिनेअगोदरच प्रकल्पात गतवर्षीचा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाची चिंता दूर झाली आहे. 

नारायणगाव (पुणे)  : कुकडी प्रकल्पात 25 टीएमसी (81.98 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी ऑक्‍टोबरअखेर प्रकल्पात 25.8 टीएमसी (84 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. या वर्षी दोन महिनेअगोदरच प्रकल्पात गतवर्षीचा उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाची चिंता दूर झाली आहे. 

कुकडी प्रकल्पातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे धरणांची उपयुक्त पाणी साठवणक्षमता 30.54 टीएमसी आहे. धरणातील पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना सिंचन व बिगर सिंचनासाठी होतो. 

कुकडी प्रकल्पाच्या धरण पाणलोट क्षेत्रात मागील वर्षी ऑक्‍टोबरअखेर सरासरी 686 मिलिमीटर पाऊस होऊन प्रकल्पात 25.8 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. कमी पाणीसाठा झाल्याने मागील वर्षी पाणीटंचाईचा सामना सात तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना करावा लागला होता. मागील वर्षी प्रकल्पात आजअखेर 17.33 टीएमसी (56.75 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. या वर्षी मागील दोन महिन्यांत धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी 917 मिलिमीटर पाऊस झाला व प्रकल्पात आज अखेर 25 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जूनअखेर तळ गाठलेल्या कुकडी प्रकल्पातील धरणात 26 जुलैपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या वर्षी दोन महिने अगोदरच चांगला पाणीसाठा झाला आहे. या वर्षी प्रकल्पात शंभर टक्के साठा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सात तालुक्‍यांतील रब्बी हंगामाची चिंता दूर झाली आहे.

कुकडी प्रकल्पात मागील एक महिन्यात एकूण 46.26 टीएमसी पाण्याची आवक झाली. पूरनियंत्रणासाठी प्रकल्पातून जवळपास 21 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती सहायक अभियंता बाळकृष्ण सावंत यांनी दिली. 
............. 
आज अखेर धरणनिहाय झालेला उपयुक्त पाणीसाठा टीएमसीत व कंसात टक्केवारी : येडगाव : 1.827 (94.02), माणिकडोह : 7.613 (74.79), वडज : 0.982 (83.87), डिंभे : 12.028 (96.27), पिंपळगाव जोगे : 2.581 (66.36).  

-कुकडी प्रकल्पात 25 टीएमसी (81.98 टक्के) उपयुक्त पाणीसाठा

 - जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना लाभ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rabbi season irrigation worries away due to cucumber project