रेबीज इंजेक्‍शनसाठी वणवण

सचिन बडे
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुणे - नगर जिल्ह्यातील एका गावात कुत्रं चावल्यानंतर ‘रेबीज’च्या इंजेक्‍शनसाठी रुग्णाला तब्बल दोनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागला. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतरही या रुग्णाची वणवण थांबली नाही. यानिमित्ताने राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये या इंजेक्‍शनचा तुटवडा असल्याचे अधोरेखित होत आहे.  

पुणे - नगर जिल्ह्यातील एका गावात कुत्रं चावल्यानंतर ‘रेबीज’च्या इंजेक्‍शनसाठी रुग्णाला तब्बल दोनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागला. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतरही या रुग्णाची वणवण थांबली नाही. यानिमित्ताने राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये या इंजेक्‍शनचा तुटवडा असल्याचे अधोरेखित होत आहे.  

नगरपासून ९० किलोमीटर अंतरावरील पाथर्डी तालुक्‍यातील चिंचपूर पांगूळ या गावात महिलेला कुत्रं चावलं. त्याची तीव्रता जास्त असल्याने तिच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार होऊ शकत नाही. त्या ठिकाणी रेबिजच्या इंजेक्‍शनचा तुटवडा असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर या महिलेचे प्राण वाचविण्यासाठी थेट ससून रुग्णालय गाठण्याचा सल्लाही दिला. मात्र  सरकारी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली नाही. 

‘डिसचार्ज’ घेऊन त्यांनी थेट एसटीत बसून पुणे गाठलं. ससून रुग्णालयात ‘केस पेपर’ काढून या महिलेला उपचारांसाठी दाखल केले खरे पण, आता त्या गरीब रुग्णाच्या नातेवाइकांच्या हातात डॉक्‍टरांनी चार हजार रुपयांची तीन इंजेक्‍शन विकत आणण्याची चिठ्ठी ठेवली आणि त्या क्षणी ‘एवढे पैसे आणायचे कसे’ हा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला.

याच दुकानातून औषध आणा!
‘रेबीज’ची लस मोफत हवी असल्यास दारिद्य्र रेषेखाली असल्याचा पुरावा सादर करा, असे ससून रुग्णालयातून सांगण्यात आले.  मात्र, त्‍यांनी ही कागदपत्रे बरोबर आणली नव्हती. ‘कागदपत्रे नाहीत, तर औषधे विकत घ्या आणि रुग्णाला द्या,’ असा ‘सल्ला’ तेथील डॉक्‍टरांनी दिला. त्याच वेळी अमुक एका दुकानातूनच हे इंजेक्‍शन मिळेल, ते सांगायलाही येथील डॉक्‍टर विसरले नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यानंतर ओळखीच्या लोकांकडून उसनवारी करून पंधरा हजार रुपये देऊन इंजेक्‍शन विकत घेतले.

औषधांचा तुटवडा
सरकारी रुग्णालयांमधील ‘रेबीज’सह इतर जीवनावश्‍यक औषधांच्या तुटवड्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार न करता पुढे ससून रुग्णालयात पाठविण्याचे प्रमाण गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने वाढले असल्याचे निरीक्षण ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांनी नोंदविले.

पुण्यात वर्षभरात रेबीजमुळे नऊ रुग्‍णांचा मृत्यू 
पुणे शहरात या वर्षात ऑक्‍टोबरपर्यंत रेबिजच्या १२ रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली. त्यापैकी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे. त्यात सर्वांत जास्त रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू जुलैमध्ये झाल्याचे सांगण्यात आले.

रेबीजच्या इंजेक्‍शनचा तुटवडा सध्या रुग्णालयात आहे. राज्य सरकारकडून त्याचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्णाला हे इंजेक्‍शन देण्यात मर्यादा पडतात. राज्य सरकारकडे नऊ हजार ‘वायल’च्या केलेल्या मागणीपैकी जेमतेम साडेचार हजार ‘वायल’ मिळाल्या आहेत. श्‍वानदंशाच्या तीव्रतेनुसार हे इंजेक्‍शन वापरावे लागते.
-डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर 

ससून रुग्णालयात दारिद्य्र रेषेखाली रुग्णांनाच फक्त महागडी औषधे मोफत दिली जातात. रुग्ण अत्यवस्थ असला तरीही किंवा परगावातील असला तरीही त्याला या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे.
- डॉ. दासवाणी, सहायक प्राध्यापक, ससून रुग्णालय 

Web Title: Rabies injection