
Milk Rate : राज्यातील दूधाच्या दराबाबत सरकार निर्णय घेणार - राधाकृष्ण विखे पाटील
बारामती : राज्यातील दुधाचे दर महाविकास आघाडी सरकारच्या काळात नीचांकी झाले होते, आमच्या सरकारच्या काळात 39 रुपयांपर्यंत दर गेले होते, सध्या दुधाचे दर कमी होत आहेत ही चिंताजनक बाब असून यामध्ये राज्य सरकार योग्य तो निर्णय निश्चित घेईल अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
बारामतीत पालखी सोहळ्याच्या तयारीच्या निमित्ताने त्यांनी आज भेट दिली, त्यावेळेस माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रश्नावर लवकरच राज्यातील सर्व सहकारी व खाजगी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अमूल सारखी संस्था आज चाळीस रुपये लिटर दूधाला भाव देऊ शकत असेल तर सहकारी संस्था असा दर का देऊ शकत नाही, वाढलेल्या खर्चाचा सर्व भार उत्पादकांनी उचलायचा हे योग्य नाही.
याबाबत आता काहीतरी निर्णय करावा लागेल. मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींची भूमिका देखील जाणून घेतली जाईल. पशुखाद्य उत्पादकांना त्यांचे दर कमी करावे लागतील,
नाहीतर सरकारला जात हस्तक्षेप करावा लागेल. त्यांनी दर कमी केले नाही तर प्रसंगी पशुखाद्याच्या उत्पादनावर नियंत्रण आणण्याचा देखील सरकारला विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
राज्याच्या विविध भागात झालेल्या दंगलींचा संदर्भ देताना आमच्या सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका या निमित्ताने राज्याच्या जनतेच्या समोर आली, अशी टीकाही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत वाया गेलेले प्रकरण
खासदार संजय राऊत यांच्या बाबत प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत हे वाया गेलेले प्रकरण आहे त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे मी जेथे जातो तेथील माध्यमांच्या बंधूंना त्यांच्यापासून सावध राहायचं सल्ला देतो त्यामुळे तुम्ही देखील त्याला फार महत्त्व देऊ नका अशी जरी टीका विखे पाटील यांनी राऊत यांच्यावर केली.