‘राफेल’बाबत काँग्रेसचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे - राफेल विमान खरेदी प्रक्रियेची संयुक्त संसदीय समिती (जेसीपी) मार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शहर काँग्रेस समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

पुणे - राफेल विमान खरेदी प्रक्रियेची संयुक्त संसदीय समिती (जेसीपी) मार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शहर काँग्रेस समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘राफेल विमान खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे टोक गाठले असून, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाबरोबर देशातील १३० कोटी जनतेला फसविले आहे.’’ शेतकरी कर्ज माफीवर भाष्य करताना बागवे म्हणाले, ‘‘देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नसल्याचे मोदी सरकार सांगत आहे. मात्र अनिल अंबानी यांचा फायदा करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विमान व्यवहार करतात हे देशाचे दुर्दैव आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून ३० हजार कोटींचा ऑफसेट पार्टनर म्हणून कंत्राट मोदी यांनी मिळवून दिले. या प्रक्रियेत देशाच्या तिजोरीचे ४१ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकार नागरिकांचा पैसा कशारीतीने खर्च करत आहे, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असायला हवी. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत केली जावी, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला करत आहोत.’’

याप्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, आबा बागूल, नीता राजपूत, अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, लता राजगुरू, चाँदबी नदाफ, बाळासाहेब अमराळे, अनिल सोंडकर, दत्ता बहिरट, अजित दरेकर आदी उपस्थित होते. 

Web Title: Rafael Congress Agitation