दाऱ्याघाटाच्या कामाचे सर्वेक्षण जून अखेर पूर्ण करणार : राघोबा महाले     

दत्ता म्हसकर
रविवार, 5 मे 2019

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील बहुचर्चित दाऱ्या घाटाच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार (ता. ३) करण्यात आला असून हे काम जून अखेर पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले यांनी दिली.

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील बहुचर्चित दाऱ्या घाटाच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार (ता. ३) करण्यात आला असून हे काम जून अखेर पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले यांनी दिली.

दाऱ्याघाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली(ता.जुन्नर) येथे सर्वेक्षण करण्यासाठी मोनार्च सर्वेअर्स अँड इंजिनिअर्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे दोन अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले, पंकज सोमवंशी यांनी जीपीएस प्रणालीचा वापर करून हे सर्वेक्षण सुरू केले आहे. येथील जमिनीचा उंचसखलपणा, माती परिक्षण, पाषाणाचे स्वरूप, अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात येणार असून याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. सुमारे दिड महीन्यात सर्वेक्षण पुर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अहवाल सादर केला जाईल असे महाले यांनी सांगितले.

जुन्नर ते मुंबई हा जवळचा मार्ग करावा यासाठी गेल्या सहा दशकांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. दोन वेळा भूमिपूजन देखील झाले होते पण काम काही सुरू झाले नाही. जुन्नरकरांच्या बहुचर्चित मागणीला प्रारंभिक यश आले आहे. यासाठी राज्य सरकारने सर्वेक्षणासाठी सुमारे एक कोटी 58 लाख  रुपयांचा निधीही मंजूर केला आहे.  
अत्यंत दुर्गम भागातून सर्वेक्षण करावे लागणार असल्याने त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच वेळी घाटपठार तसेच घाटाखालील दऱ्यांच्या भागात सर्वेक्षण होणार आहे. पावसाळयापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.     

आमदार शरद सोनवणे व आमदार किसन कथोरे तसेच शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे, विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून दाऱ्याघाटासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. दाऱ्याघाट झाल्यास जुन्नर ते मुंबई अंतर ६० किमीने कमी होणार आहे तसेच माळशेज घाटातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होऊन व पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. जुन्नर व परिसरातील तालुक्यातील शेतमाल मुंबईला अधिक जलद गतीने पोहचविणे शक्य होईल.
फोटो ओळी :  आंबोली ता.जुन्नर येथे दाऱ्याघाटाचे सर्वेक्षण पाहणी करताना डाव्या बाजूला राघोबा महाले व सर्वेअर पंकज सोमवंशी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raghoba Mahale say the survey of the work of Daaryaghat will complete at the end of June