मनाचिये वारी : आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा। कीव माझी सांगा काकुलती।।

ह.भ.प. रघुनाथ महाराज दास
मंगळवार, 30 जून 2020

गेल्या पंचवीस वर्षांपासून तमिळनाडूमधून वारीला जात आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी मी घरातील विठ्ठल कधी पाहिला नाही. यंदा पंढरीच्या पांडुरंगानेच मला घरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची संधी दिली, असा सकारात्मक भाव मी मनात ठेवतो आहे.

Wari 2020 : गेल्या पंचवीस वर्षांपासून तमिळनाडूमधून वारीला जात आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी मी घरातील विठ्ठल कधी पाहिला नाही. यंदा पंढरीच्या पांडुरंगानेच मला घरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची संधी दिली, असा सकारात्मक भाव मी मनात ठेवतो आहे. दरवर्षी वारीला तमिळनाडूतील पन्नास वारकरी वारीत सहभागी होतात. यंदा कोरोनामुळे पायी वारी नसल्याने आम्ही व्हर्च्युअल वारी करीत आहोत. दररोज काकडा, ज्ञानेश्‍वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, भजन करतो. बाबामहाराज सातारकर यांचा यू ट्यूब चॅनेलवर दिंडीतील दैनंदिन अभंग आम्ही इकडेही म्हणतो. त्यामुळे दिंडीत असल्याचा फील येतो. मागील एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंत ही व्हर्च्युअल वारी सुरूच ठेवणार आहे. कोरोनामुळे यंदा कायिक वारी होत नाही, पण वाचिक आणि मानसिक वारी सुरूच आहे.

मनाचिये वारी : एकच मागणे मागूया "वारी चुको न दे हरी'

आरोग्य आणि व्याधी मीच आहे, गीतेमध्ये देवाने सांगितले आहे. त्याच उपदेशामुळे वैष्णव, परिस्थितीमुळे येणाऱ्या तक्रारी करीत नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाने यंदा घरीच राहून पूजा करण्याची आज्ञा केली आहे, अशी भावना जगतो आहे. वारकरी संप्रदाय ज्ञानोत्तर भक्ती करतो. त्यामुळे "काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल' हा अभंग वारकरी प्रमाण मानतात. विठ्ठल सर्वत्र भरलेला आहे, त्यामुळे पंढरीला विठ्ठलाला भेटण्यासाठी जाण्यापेक्षाही संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची संगत लाभावी म्हणून जात असतो. पंढरीतील विठ्ठल आणि घरातील विठ्ठल त्या भावनेने पाहिला तर एकच आहे. पण आषाढीला संतचरणरज लाभावे, यासाठी वारकरी पंढरीला जात असतो. वारकरी लोकनिष्ठा आणि देवनिष्ठा मानतात. ते देशभक्त आहे आणि देवभक्तही आहेत. त्यामुळे यंदा देशासाठी वारी करीत नाहीत. दररोज आळंदी, देहूतून संतांच्या पादुकांचे दर्शन होत आहे. समस्त वारकऱ्यांच्या वतीने संतांच्या पादुका यंदा वारी करणार आहे. त्यांच्यासमवेत देवाला एकच निरोप पाठवूया...
आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा।
कीव माझी सांगा काकुलती।।

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raghunath maharaj das writes about pandharpur wari