''उसाला अंतिम भाव पाच हजार करा''

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

मांडवगण फराटा : 'सरकारने उसाचा पहिला हप्ता साडेतीन हजार व अंतिम भाव पाच हजार जाहीर केल्याशिवाय राज्यात ऊसतोड करू दिली जाणार नाही,'' असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. 

मांडवगण फराटा : 'सरकारने उसाचा पहिला हप्ता साडेतीन हजार व अंतिम भाव पाच हजार जाहीर केल्याशिवाय राज्यात ऊसतोड करू दिली जाणार नाही,'' असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. 

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऊस, कांदा व दूध परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. ते म्हणाले, ''मतदारांनी या पूर्वी चार वेळा सरकार बदलून पाहिली. मात्र, कोणत्याही सरकारने शेतकरी विरोधी धोरणांमध्ये बदल केला नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी विविध वेतन आयोगांमार्फत आपले पगार वाढवून घेतले आहेत. सर्व आमदार, खासदार तसेच माजी आमदारांनी आपल्या वेतन व भत्त्यांमध्ये वाढ करून घेतली आहे. सरकारी तिजोरीमधून पैसा मिळविणाऱ्यांपैकी कुणीही त्यांचे भागल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा, असे बोलत नाही. आपल्या मतांवर निवडून आलेले आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर राहिले नाहीत. त्यामुळेच अमित शहासारखा माणूस बळिराजाला पाताळात गाडणाऱ्या वामनाची जयंती साजरी करण्याची भाषा बोलतो.'' 

गोवंश हत्याबंदी कायद्याबद्दल रघुनाथ दादा पाटील म्हणाले, ''दुधाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे या कायद्यामुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्या गोठ्यांमध्ये जन्म घेणाऱ्या जर्सी गोऱ्ह्यांचे काय करायचे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. हे गोऱ्हे फुकटात सोडून द्यावे लागत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याला बाजारभाव मिळत नाही. या सर्व शेतकरीविरोधी धोरण राबविणाऱ्या पुढाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी दांडकी घेऊन उभे राहावे.'' 

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, पश्‍चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, परिषदेचे निमंत्रक अंकुश नागवडे यांची भाषणे झाली. शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काटे यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब फराटे यांनी आभार मानले. 

'सरकारला धडा शिकवा' 
''सर्व राजकीय पुढाऱ्यांनी दूध संघांवर, साखर कारखानदारींवर कब्जा मिळविल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला व दुधाला भाव मिळणे कठीण झाले आहे. शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढच होत चालली आहे. शासनाने एका हाताने कर्जमाफी देऊन लगेच दुसऱ्या हाताने रासायनिक खतांवरील अनुदान काढून घेतले. शेतकऱ्यांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात सरकारला धडा शिकविण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पेटून उठले पाहिजे,'' असे रघुनाथदादा पाटील म्हणाले.

Web Title: Raghunath Patil pitches for 5 thousand rupees rate for Sugarcane