धक्कादायक! पिंपरीत रॅगिंग पीडितालाच शाळेतून काढले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

दापोडीमधील नामांकित शाळेतील दहावीच्या एका विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न्याय देण्याऐवजी शाळा व्यवस्थापनाने त्यालाच शाळेतून काढून टाकले. यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ आणखी बिघडले आहे. 

पिंपरी : दापोडीमधील नामांकित शाळेतील दहावीच्या एका विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न्याय देण्याऐवजी शाळा व्यवस्थापनाने त्यालाच शाळेतून काढून टाकले. यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ आणखी बिघडले आहे. 

सचिन व सौरव (नावे बदलली आहेत) एकाच वर्गात शिकत होते. सचिन हा सौरवला सतत अपमानास्पद वागणूक देत असे. स्वत:चा गृहपाठ त्याच्याकडून पूर्ण करण्यास सांगणे, वर्गात बसायला जागा न देणे, इतर विद्यार्थ्यांना त्याच्याविरोधात भडकावणे अशा प्रकारामुळे सौरवचे मानसिक स्वास्थ बिघडले. यातूनच त्याने 14 ऑगस्टला "मी आत्महत्या करायला जात आहे' असा संदेश शाळेच्या 'व्हॉट्‌सअप ग्रुप'वर टाकला. संदेश वाचताच मुख्याध्यापिकांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. 
शोध घेतल्यावर सौरव सांगवीच्या पीडब्लूडी मैदानावर भेदरलेल्या स्थितीत सापडला. शिक्षकांनी विचारपूस केल्यावर त्याच्यावर होत असलेल्या रॅगिंगची घटना उघडकीस आली. हे प्रकरण सांगवी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यावर पोलिसांनी मध्यस्थी करत सचिनला समज दिली. पोलिसांच्या भीतीपोटी सचिन आता शाळेत येत नसून त्यालादेखील शाळेतून काढून टाकल्याची माहिती वर्गशिक्षिकेने दिली. मात्र, शिक्षण संस्थेने सौरवलाच शाळेतून काढून टाकून प्रकरण मिटविले. 

पीडितालाच मिळाली शिक्षा? 
कायद्यानुसार रॅगिंगपीडित विद्यार्थ्याला आधार देणे, त्याचे समुपदेशन करून त्याला चांगल्या मानसिकस्थितीत आणणे बंधनकारक आहे. मात्र, संस्थेने सौरवलाच शाळेतून काढून टाकले. शाळा बदलण्यासाठी त्याच्या पालकांवर दबाव टाकत पत्र लिहून घेतले. सौरव दहावीत असून परीक्षेला अवघे पाच महिने उरले आहेत. मात्र, शाळेने काढून टाकल्याने त्याला आणखी धक्का बसला आहे. अशा पद्धतीने कारवाई करणे चुकीचे असल्याचे सांगत पालकांनी शाळा प्रशासनाला तसेच सांगवीच्या पोलिस ठाण्यात पत्र दिले आहे. 

रॅगिंगपीडित सौरव हा विद्यार्थी निरागस व हुशार आहे. पण त्याने होत असलेल्या त्रासाबद्दल शिक्षकांना सांगणे गरजेचे होते. तो दहावीत शिकत असल्याने त्याची मानसिकस्थिती सुधारण्यासाठी त्याला शाळेतून काढले आहे. या शाळेत राहिल्यास त्याची मानसिक स्थिती बिघडू शकते. त्याच्या पालकांनी त्याला दुसऱ्या शाळेत दाखल केल्याचे समजते. 
- मुख्याध्यापिका 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raging victim removed from school in Pimpri