दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

मी पूर्वी "रॉक', "पॉप'च ऐकायचो. घरातले लोक मला नावं ठेवू लागले. तरी मी तो छंद सोडला नाही; पण एका टप्प्यावर एक भजन कानावर पडले आणि पुढच्या काही क्षणातच मला अक्षरश: वेड लागले. झपाटल्यासारखा त्या भजनाच्या मागे लागलो. त्यामुळेच आज इथंवर पोचलो. ते भजन कुमारजींचे होते, "सुनता है गुरुज्ञानी''.
- राहुल देशपांडे, गायक

पुणे - रांगोळ्यांच्या पायघड्या... पणत्यांची आकर्षक आरास... फुलांच्या माळा... अगरबत्तीचा दरवळणारा गंध... आकाशकंदिलांचा लखलखाट... गुलाबी थंडीला मिळालेली सूर्याच्या कोवळ्या किरणांची "साथ'... अशा प्रसन्न वातावरणात गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या दमदार स्वरांनी "दिवाळी पहाट' रंगवली. हा स्वरांचा "आनंदसोहळा' अनुभवताना "दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज' अशीच भावना श्रोत्यांच्या मनात निर्माण झाली होती.

"सकाळ'तर्फे आयोजित "दिवाळी पहाट' या तीनदिवसीय मैफलीचे पहिले पुष्प राहुल यांच्या सुरेल स्वरांनी रविवारी गुंफले गेले. त्यामुळे श्रोत्यांचा लक्ष्मीपूजनाचा दिवस स्वरमयी ठरला. या वेळी सकाळच्या रागांची प्रसन्न अनुभूती तर घेता आलीच. शिवाय, नाट्यगीते, भक्तिगीतांचाही आस्वादही श्रोत्यांना घेता आला. सौमित्र क्षीरसागर (हार्मोनिअम), निखिल फाटक (तबला), हृषीकेश पाटील, नारायण खिलारी (तानपुरा) यांच्या सुरेल साथीने मैफल रंगत गेली. त्यांचा "सोभा लिमिटेड'चे अतुल आगारकर, "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले, वृत्तसंपादक माधव गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. "सोभा लिमिटेड' हे "दिवाळी पहाट'चे सादरकर्ते आहेत.

राहुल यांनी आपल्या गायनाची सुरवात रामकली रागाने केली. विलंबित झपताल आणि द्रुत तीनतालातील त्यांच्या रचनांनी रसिकांना मोहवून टाकले. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात या रागाने मनामनात आनंद पेरला. माझा आवाज, लकबी हे आजोबांसारख्याच (वसंतराव देशपांडे) आहेत; पण ते मी मुद्दाम करत नाही. आपोआप होत जाते, असे सांगून राहुल यांनी आजोबांची "तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज' ही रचना सादर केली. त्यानंतर मैफल एका वेगळ्याच उंचीवर पोचली. या रचनेत राहुलबरोबरच श्रोतेही तितकेच तल्लीन झाले. हीच अनुभूती "सूर निरागस हो...', "घेई छंद मकरंद...', "दिल की तपीश...', "जमुना किनारे मिलो ना...', "बगळ्यांची माळ फुले... या रचनांवेळीही आली. "कानडा राजा पंढरीचा...' या भक्तिगीतामुळे श्रोते बसल्याजागी विठ्ठलाच्या भक्तीत हरवून गेले. अशा भक्तिमय वातावरणातच पहिल्या सत्राचा समारोप झाला.

अरणकल्ले म्हणाले,""स्वरसंचाची देखणी सजावट केलेल्या पानाफुलांतून येणारे गंधस्वर, आकाशदीपांतून पसरणाऱ्या प्रकाशातून निथळणारे तेजोमय स्वर आणि सुरावटींवर कमालीची हुकमत असणारे गायक राहुल देशपांडे यांच्या कंठातून उमलणारे लाघवस्वर अशा त्रिदली स्वरपहाटेने आपण दीपावलीचे स्वागत करीत आहोत. हे अनोखे स्वरवैभव झेलून घेणाऱ्या सभागृहात तर प्रत्येक कानामनांत अशा अनेक मैफली झंकारत आहेत. तेजोभास्कर गगनराजाची इतकी उत्कट आरती दिव्यांच्या लखलखाटाने आज सुरू आहे. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरस्मृती ताज्या होऊन आज येथे दरवळत आहेत.''

योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

दिवाळी पहाट'मध्ये आज
- कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन
- वेळ : पहाटे 5:45
- स्थळ : पंडित फार्म, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर

Web Title: Rahul Deshpande impresses music connoisseurs