Loksabha 2019 : भाऊ-दादा एकमेकांना गृहीत धरू नका

संभाजी पाटील 
रविवार, 7 एप्रिल 2019

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात येऊन ‘काहीही करा; पण पुण्याची जागा जिंकून आणा,’ असे आवाहन करून कार्यकर्त्यांना पुण्याच्या जागेचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात येऊन ‘काहीही करा; पण पुण्याची जागा जिंकून आणा,’ असे आवाहन करून कार्यकर्त्यांना पुण्याच्या जागेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. काँग्रेसच्या मदतीशिवाय जिल्ह्यातील विजय अशक्‍य असल्याची जाणीव झालेल्या राष्ट्रवादीनेही राहुल यांची आवर्जून भेट घेऊन मदतीसाठी साद घातली. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी प्रचार करताना पहिल्या दिवसापासून आक्रमक होत भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्यावर तोफ डागण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पुण्यातील लढत कोणी गृहीत धरत असेल, तर ते योग्य ठरणार नाही.

उमेदवारी देण्यास काँग्रेसने उशीर लावला खरा. त्यामुळे पक्षाला ‘ट्रोल’ही व्हावे लागले. पण, त्यातून वेळीच सावरत काँग्रेसने पुण्यातील निवडणूक एकतर्फी नाही, हा संदेश देण्यात यश मिळविले आहे. राहुल गांधी यांचा पुणे दौरा हा त्याचाच एक भाग आहे. राहुल गांधी पुण्यात जाहीर सभा घेण्याच्या फंदात पडले नाहीत. सभेला आजकाल गर्दी होईलच, याची खात्री आता नरेंद्र मोदी यांनाही देता येणार नाही. त्यामुळे पुण्याच्या मतदारांची नाडी ओळखून युवकांशी संवाद साधण्याचा राहुल यांचा प्रयोग ‘परफेक्‍ट’ ठरला. हा संवाद केवळ पुण्यापुरता होता, असे नव्हते. पुण्यात देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यांच्याशी ‘डायलॉग’ हे देशातील तरुणांच्या मताचा अंदाज घेण्यासारखे आहे. या कार्यक्रमाला अपेक्षित संख्याही सहजपणे गोळा करणे भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार विश्‍वजित कदम यांना शक्‍य झाले. राहुल यांचा हा प्रयोग काही दिवसांपूर्वी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी राबविला होता. उदयनराजे यांना महाविद्यालयात मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. पुण्यात जिंकायचे असेल, तर नवमतदारांशी नाळ जोडणे आवश्‍यक आहे, हे काँग्रेसला आता समजले आहे. राहुल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनाही ‘चार्ज’ केले. हे निवडणुकीसाठी आवश्‍यक होते. गेल्या पाच वर्षांत पुण्यातील काँग्रेसची अवस्था न सांगण्यासारखीच आहे. त्यामुळे या पंधरा-वीस दिवसांत वातावरण तयार करून विजयश्री खेचून आणण्याचे शिवधनुष्य पक्षाला उचलावेच लागणार आहे. त्यासाठी प्रचंड काम करावे ला मोहन जोशी यांनी बापट यांच्यावर टीका करून वातावरणनिर्मितीला प्रारंभ केला. पण, त्यांना विधानसभानिहाय काँग्रेस आघाडीची ताकद किती आहे, याचे भान राखावे लागेल.
भाजपने पुण्यात गेल्या पाच वर्षांत हजारी - पन्ना प्रमुखांची यंत्रणा चांगल्या पद्धतीने उभी केली आहे. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ कमिट्या प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहेत का, हे पाहावे लागेल. कारण, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील मतांच्या आकड्यांवर लक्ष टाकले, तर काँग्रेसला भरपूर काम करावे लागणार, हेच दिसते. काँग्रेसला यंदा राष्ट्रवादी आणि मनसेचे बळ मिळाले आहे. पण, सहाही मतदारसंघांतील विधानसभा निवडणुकीतील आकड्यांची बेरीज पाहता भाजपचे पारडे जड असल्याचे सांगते. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे यांना मिळालेली मते एकत्र केली आणि भाजप-शिवसेनेची मते एकत्र केली, तरी सहाही ठिकाणी भाजप-सेनेच्या मतांचा आकडाच मोठा आहे. शिवाजीनगर, कसबा पेठ आणि पुणे कॅंटोन्मेंट या मतदारसंघांतील युतीचे मताधिक्‍य तुलनेने कमी आहे. याच ठिकाणी काँग्रेसला सर्वाधिक अपेक्षा आहेत. पण, त्यासाठी काँग्रेस आघाडीची मोट घट्ट बांधावी लागणार आहे. ‘मनसे’ची मते कोठेही हलणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. एक मात्र नक्की आहे, यंदा खरोखरीच कोणतीही लाट नाही. त्यामुळे लढत ही ‘गुणवत्तेवरच’ होणार. अशावेळी भाजपही काँग्रेसला पुण्यात कमजोर मानण्याची चूक करणार नाही. काँग्रेसलाही आपल्या पायाखाली नेमके काय आहे, याचे भान ठेवावे लागेल. शेवटी चाणाक्ष मतदार कोणाला गृहीत धरणार, हेच महत्त्वाचे.

Web Title: Rahul Gandhi appealed Congress activists to win the seat of Pune