पिंपरी शहराच्या महापौरपदी राहुल जाधव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव; तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे हे भाजपचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून शनिवारी (ता. ४) निवडून आले. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका भवनात जल्लोष करून भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली. मतदानामध्ये भाजपचे नगरसेवक एकत्र असले, तरी निवडणुकीनंतर त्यांच्यातील गटबाजी दिसून येत होती. महापौरांसोबत लांडगे गटाचेच नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने होते. आमदार महेश लांडगे निवडणुकीच्या आधीपासून महापालिका भवनात उपस्थित होते.

पिंपरी - पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव; तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे हे भाजपचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून शनिवारी (ता. ४) निवडून आले. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका भवनात जल्लोष करून भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली. मतदानामध्ये भाजपचे नगरसेवक एकत्र असले, तरी निवडणुकीनंतर त्यांच्यातील गटबाजी दिसून येत होती. महापौरांसोबत लांडगे गटाचेच नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने होते. आमदार महेश लांडगे निवडणुकीच्या आधीपासून महापालिका भवनात उपस्थित होते. महात्मा जोतिराव फुले यांची वेशभूषा परिधान करीत राहुल जाधव; तर सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान करीत त्यांची पत्नी मंगल जाधव महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ पोचले, तेव्हा लांडगे त्यांच्या स्वागताला सामोरे गेले. महापालिका भवनाच्या पायरीला वंदन करून जाधव दांपत्याने भवनात प्रवेश केला. पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी होत्या. त्यांनी सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर माघारीसाठी पंधरा मिनिटे वेळ दिला. पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विनोद नढे यांना मत देणाऱ्या नगरसेवकांनी त्यांची नावे सांगत मतदान केले. त्याच पद्धतीने जाधव यांनाही भाजपच्या नगरसेवकांनी मतदान 

केले. जाधव यांना ८० मते, तर नढे यांना ३३ मते मिळाली. जाधव गेल्या वेळी मनसेचे नगरसेवक होते. त्यामुळे मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी जाधव यांना मतदान केले. शिवसेनेचे सात नगरसेवक तटस्थ राहिले. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सचिन चिंचवडे यांना ७९ मते;तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विनया तापकीर यांना ३२ मते मिळाली. या वेळी शिवसेनेचे सात, मनसेचा एक नगरसेवक तटस्थ राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित काटे महापौरांच्या निवडणुकीनंतर सभागृहातून बाहेर पडले होते. खासदार अमर साबळे, आमदार लांडगे यांनी नूतन महापौर व उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होते. महापौरपदासाठीचे भाजपमधील इच्छुक शत्रुघ्न काटे, तसेच तुषार कामठे आणि रवी लांडगे हे भाजपचे तीन नगरसेवक निवडणुकीसाठी अनुपस्थित होते. फुले पगडी परिधान केलेले महापौर जाधव आणि गांधी टोपी घातलेले उपमहापौर चिंचवडे हे व्यासपीठावर आले. गुंडे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे स्वागत केले. सभेचे कामकाज संपल्याचे गुंडे यांनी जाहीर केले. त्यानंतर सभासदांची शुभेच्छापर भाषणे सुरू झाली. तेवढ्यात मोठ्या संख्येने जल्लोष करीत कार्यकर्ते भगवे फेटे परिधान केलेल्या महिला सभागृहात आल्या. दोनशेपेक्षा अधिक उत्साही कार्यकर्ते आल्याने सभेचे कामकाज आटोपते घेण्यात आले.

रिक्षाचालक ते महापौर
महापौर राहुल गुलाब जाधव (वय ३६) यांनी तरुणपणी सहा आसनी रिक्षाचालक म्हणून काम केले. त्यानंतर काही काळ खासगी संस्थेत नोकरी करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करीत राजकारणात प्रवेश केला. नागरी प्रश्‍नांसाठी आंदोलने केली. ते मनसेचे नगरसेवक म्हणून २०१२ मध्ये महापालिकेत निवडून आले. गेल्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. ते चिखली, जाधववाडी, मोशी या प्रभागांतून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले. पहिल्या वेळीही ते महापौरपदासाठी इच्छुक होते. गेल्या मार्चमध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले नाही, म्हणून त्यांनी समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या जागी भाजपने जाधव यांची निवड केली. त्यांनी दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.

उद्योजक ते उपमहापौर
शेतकरी कुटुंबात जन्मलेले उपमहापौर सचिन चिंचवडे (वय ३९) यंदा प्रथमच महापालिकेत निवडून आले. आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते कट्टर समर्थक आहेत. त्यांनी श्री गुरुदत्त मित्र मंडळाची स्थापना केली. पृथ्वीशौर्य प्रा. लि. कंपनी व सीताई दूध डेअरी या माध्यमातून त्यांनी उद्योगधंद्यात पाऊल टाकले. सहकार क्षेत्रात पवना सहकारी बॅंकेचे संचालक म्हणून तीन वर्षे त्यांनी कार्यभार सांभाळला. भाजपचे उमेदवार म्हणून चिंचवडे यांनी २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचा पराभव केला. पहिल्याच वर्षी ‘ब’ प्रभाग क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या ते विधी समितीचे सदस्य आहेत.

Web Title: Rahul Jadhav new Mayor of Pimpri Chinchwad