'भीमा-पाटस कारखान्यावर शिंतोडे उडू देणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पाटस - ‘‘भीमा-पाटस कारखान्याला मध्यंतरी साखरेचा दर घसरल्याने मोठ्या अडचणी आल्या. मात्र, दोन महिने थांबल्यामुळे साखरेला चांगला बाजारभाव मिळाला. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत. यंदा बॅंकेचा एक रुपयाही न घेता कारखाना सुरू करण्याचे नियोजन आहे. कारखान्यावर कोणी शिंतोडे उडविण्याची आम्ही संधी देणार नाही. सभासदांनी आमच्यावर टाकलेल्या विश्‍वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही,’’ असे प्रतिपादन आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले.

पाटस (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या एक कोटी ऐंशी लाखाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. या प्रसंगी रासपचे जिल्हाध्यक्ष हरीश खोमणे, तालुकाध्यक्ष दादा केसकर, सरपंच वैजयंता म्हस्के, योगेंद्र शितोळे, साहेबराव वाबळे, डॉ. मधुकर आव्हाड, संभाजी खडके, कलावती मोहिते, तानाजी केकाण, काका पाटील आदी उपस्थित होते.

कुल म्हणाले, ‘‘दौंड तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही. इतर तालुक्‍यांच्या तुलनेत दौंड तालुक्‍यात विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र, विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. तालुक्‍यात रस्ते व विजेसंदर्भात ठोस पावले उचलण्यात येत आहेत. शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त रोहित्र बसविण्याचे काम लवकरच सुरू होणार आहेत. शिव-पाणंद रस्ते खुले करण्याच्या भूमी अभिलेखच्या अटी-शर्ती कमी करण्यात आल्या आहेत. विकासाबाबत वरवंडसारखे नियोजन करा. निधी कुठेच कमी पडू देणार नाही.’’

या वेळी ग्रामपंचायतीचे सदस्य संभाजी चव्हाण व संभाजी खडके यांनी कुल गटात प्रवेश केला. या वेळी अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिकांना खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. साहेबराव वाबळे यांनी प्रास्ताविक; तर डॉ. मधुकर आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले.

विरोधकांचा समाचार
ग्रामपंचायतीने लावलेल्या विकासकामांच्या यादीचा व कार्यक्रमाच्या फ्लेक्‍सवरून विरोधकांनी, विकासकामांचे श्रेय लाटल्याचा आरोप करीत निषेधाचा फ्लेक्‍स लावला. त्याचा कुल यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘कामे आम्ही मंजूर करतो. त्याचे भूमिपूजन करताना तुम्हाला लाज वाटत नाही अन्‌ आमचा निषेध कशासाठी करता?’’

पुण्यातील खडकवासला व इतर धरणे ही केवळ शेतीसाठी आहेत. भविष्यात दौंड तालुक्‍याला शेतीसाठी कधीच पाणी कमी पडणार नाही, याचे नियोजन करीत आहोत. तालुक्‍यातील बेबी कालव्याचे दुसऱ्या टप्प्यातील काम येत्या काही महिन्यांत सुरू करणार आहोत. 
 - राहुल कुल, आमदार

Web Title: rahul kul Bhima-Patas Factory