राहुलनगरमधील उद्यान झाले भकास

Rahulnagar-Udyan
Rahulnagar-Udyan

कोथरूड - राहुलनगर परिसरातील पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाच्या जागेचा प्रश्‍न सात- आठ वर्षांपासून न्यायप्रविष्ट असल्याने उद्यानाच्या कामासाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. भूसंपादनाबाबत मूळ जागामालक न्यायालयात गेल्याने अनेक वर्षांपासून या उद्यानाला कुलूप लागले आहे. त्यामुळे हे उद्यान आता भकास झाले आहे.

कोथरूड भागातील राहूलनगर परिसरात महापालिकेच्या वतीने २००८ साली पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान विकसित करण्यास सुरवात झाली. पूर्वी अस्तित्वात असलेले गाव व गावातील बारा बलुतेदार संकल्पना या उद्यानात साकारण्यात येणार होती. उद्यानासाठी आरक्षित असलेली जागा मोबदल्यापूर्वीच जागामालकांनी ताब्यात दिली, असे जागामालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्यानाच्या कामाला सुरवात झाली. प्रत्यक्ष जागेवर बारा बलुतेदारांसाठी गाळेही बांधण्यात आले. बाग विकसित करण्यात आली.

सीमा भिंतीचेही काम पूर्ण झाले आणि किरकोळ कामे शिल्लक असताना महापालिकेने आरक्षित जागेपेक्षा अधिक जागा ताब्यात घेतल्याचा व त्याचा योग्य मोबदला न मिळाल्याचा दावा करत जागामालक शिरीष भुजबळ, सुनील भिडे, नगरकर न्यायालयात गेले. त्यामुळे उद्यानाला कुलूप लागले. त्यामुळे अनेक वर्षे उद्यान जैसे थेच आहे.

पालिकेची निवाडा पद्धत चुकल्यामुळे हा वाद निर्माण झाला. आरक्षित जागेचाच योग्य मोबदला आम्हाला हवा आहे. जी जागा आरक्षणात नाही, ती ताब्यात घेऊन त्याचा मोबदला आम्हाला कशासाठी देऊ करत आहेत. आमची आरक्षित जागा मोबदल्याची प्रक्रिया राबविण्यापूर्वी ताब्यात दिली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे उद्यानाचे काम थांबले आहे.
- शिरीष भुजबळ, जागामालक

या उद्यानाच्या काही जागेच्या मालकीबाबतीत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ही विवादीत जागा नेमकी कोणाची आहे, हे स्पष्ट करणार आहेत. तसेच ज्या जागामालकांची जागा ताब्यात देण्यास संमती आहे. त्यांना आम्ही महापालिकेच्यावतीने मोबदला देणार आहे.
- संतोष भोर, उपायुक्त, भूमी जिंदगी विभाग 

दहा वर्षे हे उद्यान धूळ खात पडून आहे. महापालिकेने आवश्‍यक त्या सर्व बाबी पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करून द्यावे.
- अनिरुद्ध खांडेकर, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com