‘पीएफआय’च्या पाच जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएफआय’च्या पाच जणांना अटक

‘पीएफआय’च्या पाच जणांना अटक

पुणे/ औरंगाबाद/ नाशिक : देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करीत असल्याच्या संशयावरून ‘पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया’ या संघटनेविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशाबरोबरच महाराष्ट्रातही छापे घातले. राज्यात दहशतवादविरोधी पथकाने पहाटेला छापासत्र राबवून पाच जणांना एकाचवेळी अटक केली. यात या संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला मालेगावातून तर पुण्यातून दोघे, बीडमधून एक आणि कोल्हापूरातून एक असे पाच जणांचा समावेश आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या संशयितांना येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया या संघटनेचा जिल्हाध्यक्ष मौलाना सैफुर्ररहमान सईद अहमद अन्सारी (रा. मालेगाव) याच्या मालेगावातील हुडकोतील निवासस्थानी गुरुवारी (ता.२२) पहाटे नाशिक एटीएसच्या पथकाने छापा टाकून अटक केली. त्याचवेळी पुणे, कोल्हापूर आणि बीडमधूनही एटीएसच्या पथकांनी छापा टाकून संशयितांना अटक केली. ही कारवाई एटीएसच्या पुणे क्षेत्राचे पोलिस अधीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सायंकाळी पाचही संशयितांना नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी संशयितांना ३ ऑक्टोबरपर्यंत १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच ‘पीएफआय’च्या जळगाव, नवी मुंबई, ठाणे, मुंबईच्या कार्यालयांवर व पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवरही छापे घातले. राज्यभरात २० जणांना ताब्यात घेतले होते.

अटक करण्यात आलेले संशयित

मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (२६, मालेगाव, जि. नाशिक), अब्दुल कय्यूम बादुल्ला शेख (४८, रा. कोंढवा, पुणे), रब्बी अहमद खान (३१, रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर).

मराठवाड्यात कारवाई

मराठवड्यातही काही ठिकाणी छापे घातले आहेत. नांदेडला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एकजण ताब्यात घेतला. परभणीत चार, औरंगाबादेतील चौघांना ताब्यात घेतले होते. बीडमध्येही कारवाई झाली.

पुण्याच्या कोंढव्यात कारवाई

पुणे: राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाने पुणे शहरातील कोंढवा भागात छापा मारत कारवाई केली. यात पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यातील तिघांना चौकशी करून सोडले आहे तर माजी राज्य सचिव आणि पुणे शहराच्या उपाध्यक्षाला अटक केली आहे. रब्बी खान हा संघटनेचा माजी राज्य सचिव तर अब्दुल शेख हा शहर उपाध्यक्ष आहे. रब्बी याचे वडील लष्करात कार्यरत होते. त्यांचे कुटुंब पाच वर्षांपूर्वी अशोक म्युजमध्ये रहायला आले आहे. रब्बी खान हे संगणक व्यावसायिक तर अब्दुल शेख बांधकाम व्यावसायिक आहे. हे छापे टेरर फंडीग प्रकरणी टाकले आहेत.

Web Title: Raids By Ats At Pune Kolhapur Five Persons Of Popular Friend Of India Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..