हॉटेल्स, क्‍लब व हुक्का पार्लरवर छापे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

शहरातील नाईट लाइफच्या नावाखाली पंचतारांकीत हॉटेल्स, क्‍लब व हुक्का पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पावले उचलण्यास प्रारंभ केला. पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत बारा पंचतारांकीत हॉटेल्स, क्‍लब व हुक्का पार्लरवर छापे घातले. पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

पुणे - शहरातील नाईट लाइफच्या नावाखाली पंचतारांकीत हॉटेल्स, क्‍लब व हुक्का पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पावले उचलण्यास प्रारंभ केला. पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत बारा पंचतारांकीत हॉटेल्स, क्‍लब व हुक्का पार्लरवर छापे घातले. पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

"नाईट लाइफ'चा आनंद घेणाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन, विशेष पथक तयार केले होते. अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग, पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे, भानुप्रताप बर्गे यांच्यासह पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्रीपासून कारवाईस सुरवात केली. 

विशेष पथकाने बॉम्बे पोलिस ऍक्‍टअंतर्गत नाईट लाइफसाठी प्रसिद्ध असलेल्या नामांकित हॉटेल्सवर कारवाई केली. त्यात मॅक्‍लारेन पब, डेली ऑल डे, द बार स्टॉक, मियामी, चतुःश्रृंगी येथील जे डब्ल्यू मेरियेट, नाईट रायडर, नाईट स्काय, वेस्टइन, पेन्टहाऊस, हार्डरॉक, ओकवूड लाऊन्ज, ब्ल्यू शॅक अशी या हॉटेल्सची नावे आहेत. कारवाईवेळी संबंधित ठिकाणी पाच ते आठ हजार तरुण-तरुणी उपस्थित होते. 

वाढत्या उपद्रवामुळे कारवाई 
शहरातील विमाननगर, कल्याणीनगर व कोरेगाव पार्क या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पब आहेत. मध्यरात्रीपासून पहाटे पाचपर्यंत तरुणांचा तिथे गोंधळ सुरू असतो. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडण्यापासून मद्यपान केलेल्यांमध्ये भांडणे, रॅश ड्रायव्हिंग, मारामाऱ्या ते पिस्तुलाने गोळ्या झाडण्यापर्यंतचे अनेक प्रकार घडतात. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: Raids on hotels, clubs and hookah parlor