रेल्वेच्या लाखभर फुकट्या प्रवाशांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

उच्चांकी दंडवसुली
रेल्वेच्या पुणे विभागात एका दिवसात तिकीटतपासणीत उच्चांकी दंड ठोठावला आहे. २४ ऑक्‍टोबर रोजी तिकीटतपासणीत एका दिवसात १९ लाख ६५ हजार रुपये ही सर्वाधिक दंडात्मक वसुली केली. मागील वर्षी ५ नोव्हेंबर रोजी एका दिवसात १७ लाख ७० रुपयांचा दंड विन तिकीट प्रवास करणाऱ्यांना ठोठावला होता. ही कारवाई पाच तिकीट निरीक्षकांनी केली.

पुणे - फुकट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष अभियान राबविले. याअंतर्गत सात महिन्यांत पुणे विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे एक लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे पाच कोटी ७३ लाख रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १५ टक्‍क्‍यांनी फुकटात प्रवास करणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.

पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर भागात तिकीटतपासणी अभियान राबविले. त्यामध्ये ही कारवाई केली. एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांत विभागामध्ये दोन लाख १९ हजार ६४७ प्रकरणे उघडकीस आली. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ११ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल केला. त्यामध्ये ९९ हजार ८२९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून दंडाच्या स्वरूपात पाच कोटी ७३ लाख रुपये वसूल केले.

गेल्या वर्षी याच कालावधीत एक लाख ९४ घटनांमध्ये नऊ कोटी ३३ लाखांचा दंड ठोठावला होता. तर, ८७ हजार प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले होते. त्यांच्याकडून चार कोटी ७७ लाखांचा दंड वसूल केला होता. यावरून मागील वर्षाच्या तुलनेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये १४.६७ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway passenger crime