विद्यार्थ्यासाठी देवदूत बनून धावले रेल्वे पोलीस

गणेश बोरुडे
शुक्रवार, 23 मार्च 2018

तळेगाव स्टेशन (पुणे) : वेळ आली होती पण काळ आला नव्हता याचीच प्रचिती गुरुवारी सायंकाळी (ता.२३) तळेगाव रेल्वे स्थानकावर पुन्हा आली. धावत्या लोकलला पकडण्याच्या प्रयत्नात फलाटावर अडखळून पुन्हा गाडीखाली फेकल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याला रेल्वे मार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीसांनी तत्परता दाखवत देवदूत बनून वाचवले.

तळेगाव स्टेशन (पुणे) : वेळ आली होती पण काळ आला नव्हता याचीच प्रचिती गुरुवारी सायंकाळी (ता.२३) तळेगाव रेल्वे स्थानकावर पुन्हा आली. धावत्या लोकलला पकडण्याच्या प्रयत्नात फलाटावर अडखळून पुन्हा गाडीखाली फेकल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याला रेल्वे मार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीसांनी तत्परता दाखवत देवदूत बनून वाचवले.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात कधी-कधी अंगावर शहारे आणणारे प्रसंग पहायला मिळतात. असाच एक प्रसंग गुरुवारी सायंकाळी रेल्वे स्थानकावर घडला. सार्थक संजय शेलार हा सरस्वती विद्या मंदिरचा इयत्ता नववीचा विद्यार्थी शाळेसाठी बालवाडीपासून शेलारवाडी ते तळेगाव स्टेशनला लोकलने ये जा करतो. गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी स्टेशनला आला. सव्वासहाच्या दरम्यान प्रवाशी चढ उतार करुन पुण्याच्या दिशेने नुकत्याच वेग घेतलेल्या लोणावळा-पुणे डाऊन लोकल गाडीला पकडण्याच्या नादात सार्थकचा तोल गेला आणि शेवटच्या दोन डबे पुढे जाण्याअगोदर तो धाडकन फलाटावर फेकला जाऊन पुन्हा त्याच वेगाने ट्रॅकच्या दिशेने घरंगळत चालला. नेमके त्याच वेळी लोहमार्ग पोलिस हवालदार संजय तोडमल आणि रेल्वे सुरक्षा पोलीस संजय भालके हे फलाटावर उभे राहून, धोकादायक पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचे छायाचित्रण करुन समुपदेशन करत होते. त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता, सार्थकला हाताने कवळ घालत बाजूला ओढले.

त्याचवेळी सूर्यभान फुलमाळी आणि जनाबाई फुलमाळी हे प्रवाशी दांपत्य हातातील सामान टाकत पोलिसांच्या मदतीला धावले. गाडी निघून गेली आणि हातापायाला खरचटून सालपटलेल्या गर्भगळीत सार्थकला घेऊन पोलीस चौकीत आणत प्रमोपचार केले. थोडा स्थिरावल्यानंतर वडिलांचा मोबाईल नंबर विचारत त्यांना बोलावून घेतले. झालेली घटना कळल्यानंतर धापा टाकत रेल्वे पोलीस चौकीत पोहोचलेल्या संजय आणि वृषाली शेलार यांना, अपघातातून वाचलेलया आपल्या पोटच्या गोळ्याला सुस्थितीत पाहून अश्रू अनावर झाले. भावुक आलेल्या आईने धावत जाऊन पेढे आणत पाणावलेल्या डोळ्यांनी गणपतीच्या प्रतिमेसमोर ठेऊन मुलासह पोलिसांच्या हाती पेढा देत, परमेश्वरासह देवदूत बनून आलेल्या लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले. घडला प्रकार समजल्यानंतर तिकडे पोहोचलेले सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी सार्थकच्या आई वडिलांना धीर देत पोलिसांचे कौतुक केले. पोलिसांनी आई वडिलांचा जवाब लिहून घेत पुन्हा घाई गडबडीने धावती गाडी न पकडण्याचा सल्ला देत सार्थकला आई वडिलांच्या हवाली केले.

Web Title: railway police saves life of student