रेल्वेचा भार रस्ते वाहतुकीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

सातारा रस्त्यावर खड्ड्यांमुळे खोळंबा 
सातारा रस्त्यावर खेड शिवापूर ते शिरवळदरम्यान सध्या वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कापूरहोळ, सारोळे येथेही वाहनचालकांना कोंडीला सामोरे जावे लागते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची देखभाल दुरुस्ती रिलायन्स कंपनीकडे आहे. परंतु, त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे कोंडी वाढत आहे. राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळाकडे याबाबत पोलिस पाठपुरावा करीत आहेत.

पुणे - पुणे- मुंबई तसेच कोल्हापूर-मिरज, सोलापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळित झाल्यामुळे मुंबई-पुणे-कोल्हापूर रस्त्यावरील वाहतूक गेल्या तीन दिवसांत सुमारे ३० टक्‍क्‍यांनी तर, द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुमारे २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे महामार्ग पोलिसांनी १२ जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मध्य रेल्वेची मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज, सोलापूर मार्गावरील वाहतूक गेल्या तीन दिवसांपासून विस्कळित झाली आहे. त्यामुळे या मार्गांवरील अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने सुमारे २०० जादा गाड्या उपलब्ध केल्या आहेत. त्यातच महालक्ष्मी एक्‍स्प्रेस पुरात अडकल्यामुळे धास्तावलेले नागरिक स्वतःच्या वाहनांना पसंती देत आहेत.

परिणामी, रस्त्यावरील वाहतुकीत वाढ झाली आहे, असे निरीक्षण महामार्ग विभागाच्या पुणे विभागाचे अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी नोंदविले आहे. 

वाहतूक वाढल्यामुळे द्रुतगती मार्गावर वडगाव आणि खंडाळा येथे प्रत्येकी ६० आणि ७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रामधील १२ जिल्ह्यांतील तसेच नगर येथील महामार्ग पोलिसांच्या रजा, सुट्ट्या शनिवारपासून रद्द करण्यात आल्या आहेत. या विभागात सुमारे ७०० अधिकारी आणि कर्मचारी आहेत. द्रुतगती रस्त्यावर वाहतूक वाढल्यामुळे तेथे अन्य जिल्ह्यांतून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कात्रज-देहूरोड रस्त्यावर कोंडी 
कात्रज-देहूरोड रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर सध्या चिखल साचला आहे. तसेच, कचऱ्याचेही ढीग आहेत. परिणामी, हिंजवडी आणि परिसरात जाणारे अनेक दुचाकीचालक सध्या महामार्गावरून जात आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी महामार्गावर दुचाकींचीही गर्दी होऊ लागली आहे. सर्व्हिस रस्ते खुले करावेत, अशी मागणी शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘एनएचएआय’, दोन्ही महापालिकांकडे केली आहे. त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Rain Road Transport