दिवाळीमुळे रेल्वेचे आरक्षण हाउसफुल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

पुणे - नागपूर, अमरावती, बल्लारशा, पाटणा, वाराणसी, जयपूर, गोरखपूर, निजामुद्दीन आदी मार्गांवर रेल्वे गाड्यांचे आरक्षण ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. जादा गाड्या सोडल्याचा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा दावा आहे. 

पुणे - नागपूर, अमरावती, बल्लारशा, पाटणा, वाराणसी, जयपूर, गोरखपूर, निजामुद्दीन आदी मार्गांवर रेल्वे गाड्यांचे आरक्षण ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. जादा गाड्या सोडल्याचा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा दावा आहे. 

उत्तरेकडे तसेच नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा आदी मार्गांवर जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण २० ऑक्‍टोबरपासूनच फुल्ल झाले आहे. सुमारे १० नोव्हेंबरपर्यंत या गाड्या फुल्ल आहेत. विशेषतः नागपूर मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण दहा नोव्हेंबरपर्यंत संपले आहे. सध्या या मार्गांवरील गाड्यांचे वेटिंग १०० पासून ३०० पेक्षा जास्त झाले आहे. यंदा २५ ते २९ ऑक्‍टोबरदरम्यान दिवाळी आहे. त्यामुळे प्रवाशांची २० ऑक्‍टोबरपासूनच घरी जाण्यासाठी गर्दी सुरू झाली आहे. रेल्वेने सात मार्गांवर जादा ‘सुविधा’ गाड्या सोडल्या आहेत. परंतु त्यांचेही आरक्षण मिळणे प्रवाशांना दुरापास्त झाले आहे. या बाबत पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले, ‘‘दिवाळीदरम्यान प्रवाशांची संख्या वाढते, हे लक्षात घेऊन, जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्याची पूर्वसूचनाही देण्यात आली होती. परंतु प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.’’

मूळचे नागपूरचे असलेले प्रसाद रुईकर म्हणाले, ‘‘दिवाळी दरम्यान प्रवाशांची संख्या वाढते, हे लक्षात घेऊन नागपूर मार्गासाठी रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले पाहिजे. एक किंवा दोन गाड्या सोडून प्रश्‍न सुटणार नाही, तर प्रवाशांच्या संख्येनुसार गाड्यांचे नियोजन केले पाहिजे.’’ आर्या बोराडे म्हणाले, ‘‘मला २२ ऑक्‍टोबरला सुमारे अडीच महिन्यांपूर्वीच आरक्षण केले होते. या काळात खासगी बसचे दर डबल होतात, त्यामुळे ते परवडत नाही.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway reservation houseful due to Diwali