रेल्वे सिग्नल केबलची चोरी

सुधीर साबळे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पिंपरी - तुम्ही जर पुणे ते लोणावळा मार्गावर रेल्वेने प्रवास करत असाल आणि गाडी अचानक बराच वेळ एखाद्या स्थानकावर थांबली तर या मार्गावरील सिग्नल यंत्रणा कदाचित बंद पडलेली असू शकते. सिग्नलची केबल तुटल्याने गाडीला बराच वेळ थांबावे लागते. याचे मूळ कारण ही केबल तोडून चोरी होणे आहे. गेल्या वर्षभरात या मार्गावर तब्बल बारा वेळा सिग्नलच्या केबल तोडण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून याबाबत कायदेशीर उपाय करण्यात येणार आहेत.

सिग्नल केबल तोडण्याचे सर्वाधिक प्रकार पिंपरी, तळेगावजवळील बेगडेवाडी, वडगाव आणि मळवली परिसरात झाले आहेत. या प्रकारामुळे रेल्वे यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली असून, असे प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सिग्नलसाठी तांब्याच्या केबलचा वापर करण्यात येतो. केबल तोडल्यानंतर त्यामधील तांबे काढून त्याची विक्री करण्याचा उद्योग काही जण करतात. केबल तुटल्यानंतर सिग्नल यंत्रणा तत्काळ ठप्प होते, याची माहिती काही क्षणात रेल्वे प्रशासनाला समजते. त्यानंतर मार्गावरील वाहतूक तत्काळ पूर्ववत करण्यात येत असली तरी अशा प्रकारांमुळे रेल्वे गाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या दृष्टीने सुरक्षेची पावले उचलली आहेत. 

दरम्यान, पुणे ते लोणावळा या मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे सिग्नल यंत्रणेची केबल तोडण्याच्या प्रकारामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मळवली परिसरात लोहमार्ग परिसरातील माती जेसीबीने काढताना येथील सिग्नलची केबल तुटली. त्यानंतर प्रशासनाने संबंधितांवर पोलिसांकडे गुन्हा दाखल केल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी सांगितले.

केबल तोडण्याचे प्रकार होणारी ठिकाणे 
पिंपरी, बेगडेवाडी, वडगाव, मळवली

कशासाठी केबल तोडली जाते?
सिग्नलच्या केबलमध्ये तांब्याचा वापर केला जातो. हे तांबे काढून विकले जाते.

पुणे ते लोणावळा लोहमार्ग
प्रवाशांची संख्या - ३.६ कोटी
वार्षिक उत्पन्न - २० कोटी

पुणे ते लोणावळा मार्गावर सिग्नलच्या केबल तोडण्याच्या प्रकाराची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत प्रशासनाने माहिती जमा केली असून अधिकारी त्यावर लक्ष ठेवून आहेत. असे प्रकार करणाऱ्यांवर प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात येतील. 
- मिलिंद देऊस्कर, विभागीय महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

Web Title: Railway Signal Cable Theft Crime