शहरातील रेल्वे स्टेशन कात टाकणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पिंपरी -  शहरातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशनवर असलेल्या असुविधांवर "सकाळ'ने वारंवार प्रकाश टाकला होता. 

पिंपरी -  शहरातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशनवर असलेल्या असुविधांवर "सकाळ'ने वारंवार प्रकाश टाकला होता. 

रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नवीन नियोजनानुसार पिंपरी, चिंचवड स्टेशनांवर सहा मीटर रुंदीचा सरकता जिना (एस्कलेटर) बसविण्यात येणार आहे. याखेरीज चिंचवड स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पादचारी पूल (एफओबी) बांधण्यात येणार आहे. आकुर्डी स्टेशनवर आरक्षणासाठी अतिरिक्‍त तिकीट खिडकी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रावेत, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण, निगडी तळवडे भागांतील प्रवाशांची सोय होणार असल्याचे मध्य रेल्वेचे सहाय्यक सचिव सु. मु. केळकर यांनी सांगितले. त्यांनी याबाबत चिंचवड प्रवासी संघाला कळविले आहे. 

प्रवासी संघाने याबाबत 12 जानेवारीला केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍वनी लोहाणी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या स्टेशनची पाहणी करून सुविधा देण्याचा निर्णय घेतला. 

दापोडी ते देहूरोड दरम्यानच्या स्टेशनवर ज्या ठिकाणी छताचे पत्रे खराब झाले आहेत, ते बदलण्यात येणार आहेत. संध्याकाळी कासारवाडी आणि देहूरोड या स्टेशनवर ये-जा करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लोणावळ्यापर्यंतच्या स्टेशनदरम्यान ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे, ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

चिंचवडला थांबणाऱ्या रेल्वे गाड्या आणि रेल्वेच्या डब्यांची माहिती प्रवाशांना व्हावी, यासाठी लवकरच इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड बसविण्यात येणार आहे. रेल्वेने एकाच प्लॅटफॉर्मवर ही सुविधा बसविण्यास मान्यता दिली आहे. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरदेखील ती देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघाने केली आहे. तसेच स्टेशनवरील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव स्टेशनांवर रेल्वे गाड्यांची माहिती देण्यासाठी बसविण्यात येणाऱ्या उद्‌घोषणा प्रणालीचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

चिंचवडला नवीन पादचारी पूल 
चिंचवड स्टेशनवर अनेक गाड्या थांबतात. मात्र येथे एकच पादचारी पूल असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होते. ती कमी करण्यासाठी या ठिकाणी नवीन पादचारी पूल बांधण्याचे मध्य रेल्वेने ठरविले आहे. येत्या वर्षाअखेरीस या कामाला सुरवात होऊन पुढील वर्षात तो कार्यान्वित होण्याची शक्‍यता आहे. 

या सुविधा मिळणार 
- सरकता जिना 
- पादचारी पूल 
- इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले 
- महिला पोलिसांचा बंदोबस्त 
- छताला नवीन पत्रे 
- प्लॅटफॉर्मची उंची वाढणार 
- उद्‌घोषणा प्रणालीचे आउटसोर्सिंग 

Web Title: railway station pimpri news sakal news impact