पुण्यात बरसला "रेकॉर्ड ब्रेक' पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

पुणे संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील "रेकॉर्ड' मोडले. यापूर्वी 2014 मध्ये 282.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जुलैच्या तीस दिवसांमध्ये 359.2 मिलीमीटर पाऊस नोंदला असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 
 

पुणे संततधार पडणाऱ्या पावसाने पुण्यात जुलैमधील गेल्या दहा वर्षांतील "रेकॉर्ड' मोडले. यापूर्वी 2014 मध्ये 282.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी जुलैच्या तीस दिवसांमध्ये 359.2 मिलीमीटर पाऊस नोंदला असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत. जुलैच्या सुरवातीला दमदार पावसाने हजेरी लावली होती. महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाचा हा जोर कायम होता. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. कमाल तापमान सरासरीपेक्षाही जास्त वाढले. उन्हाचा चटका वाढला. गेल्या चार दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली. सलग चार दिवस पावसाच्या सरी एकामागून एक पडत आहे. महिन्याच्या सुरवातीला पडलेला पाऊस आणि पुन्हा सक्रीय झालेला मॉन्सून यामुळे जुलैमधील गेल्या दहा वर्षांमधील पावसाचा उच्चांक यंदा मोडला. 

पुण्यात 2009 ते 2018 या दहा वर्षांमध्ये 2014 साली 282.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा आतापर्यंत 359.2 मिलीमीटर पाऊस पडला आहे. हा गेल्या दहा वर्षांमधील उच्चांकी पाऊस असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. 
पुण्यात या वर्षी 1 जून ते 30 जुलै दरम्यान 561.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत सरासरी 315.2 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा 246.6 मिलीमीटर जास्त पाऊस पडला असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

शहरात सरीवर सरी 
शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. दुपारी काही वेळ पावसाने काही वेळ विश्रांती घेतली. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पावसाला सुरवात झाली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे 8.7 मिलीमीटर पाऊस पडला होता. तर लोहगाव येथे 9.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 34.6 मिलीमीटर पाऊस पडला. तर पाषाण येथे याच वेळेत 48.2 मिलीमीटर पाऊस नोंदण्यात आला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain breaks record in Pune