धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर पावसाची बॅटिंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

 भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. खडकवासला धरणातून सकाळी १३ हजार ९८१ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता.

पुणे - भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. खडकवासला धरणातून सकाळी १३ हजार ९८१ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता. रात्री नऊ वाजता तो वाढवून १८ हजार ४९१ क्‍युसेक करण्यात आला. इतरही धरणांतून विसर्ग सुरू आहे.

खडकवासला धरण साखळीतील चार धरणांपैकी पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर, टेमघर धरणात सुमारे ९० टक्‍के पाणीसाठा आहे. भामा आसखेड, डिंभे, चासकमान, वडज, गुंजवणी, नीरा देवघर आणि भाटघर ही धरणे शंभर टक्‍के भरली आहेत. पवना, घोड, पिंपळगाव जोगे धरणात ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा असून, माणिकडोह धरणात ७६ टक्‍के आणि येडगाव धरणात ६० टक्‍के साठा आहे. 

वीर धरणातून नीरा नदीत २३ हजार २३५ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता. धरणातील येवा वाढल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे रात्री नऊ वाजता ३२ हजार ५०९ क्‍युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. भीमाशंकर परिसरात पाऊस होत असल्यामुळे चासकमान धरणातून रात्री आठ वाजल्यापासून भीमा नदीत एक हजार ११० क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. भामा आसखेडमधून विसर्ग कमी करून एक हजार ६५३ क्‍युसेक केला आहे. 

मुळशी धरणातील विसर्ग दुपारी तीन वाजता दहा हजार क्‍युसेकवरून १५ हजार चारशे क्‍युसेक करण्यात आला. वळवण धरणातून १८० क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. शिरोटा धरण परिसरातही दमदार पाऊस होत असून, धरणाच्या सांडव्यावरून ७३० क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in the dam area