खरेदीला पावसाचीही हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : आश्‍विन अमावास्येला महाराष्ट्राच्या सेवेला आंध्र प्रदेश, कर्नाटकची "लक्ष्मी' (केरसुणी) आली. साळीच्या लाह्या, बत्तासे, कारटे, ऊसही आला. मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचे म्हणून सराफी पेढ्यांवरही लक्ष्मी-कूबेर यंत्र व मूर्तीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती; परंतु नरकचतुर्दशीला अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेते आणि खरेदीदार पुणेकरांच्या उत्साहावर काहीसे पाणी पडले. पाऊस थांबल्यावर मात्र पुन्हा सायंकाळी उशिरापर्यंत लक्ष्मीपूजनानिमित्तच्या पूजासाहित्य खरेदीचा आनंद नागरिकांनी घेतला. 

महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर; तसेच मध्यवर्ती पेठा व उपनगरांतील चौका-चौकांत पथारीवाल्यांनी सकाळपासून लक्ष्मीपूजनासाठी आवश्‍यक साहित्य विक्रीच्या पथाऱ्या मांडल्या होत्या. झेंडू, लक्ष्मीची पीओपीची मूर्ती यासह पूजा साहित्य खरेदीसाठी दुपारच्या भोजनानंतर नागरिक बाहेर पडले होते; पण धनत्रयोदशीप्रमाणे नरकचतुर्दशीलाही पावसाने हजेरी लावल्याने काही विक्रेत्यांकडील पूजासाहित्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. ग्राहकांचाही हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले. खरेदी-विक्रीवरही परिणाम जाणवला. पाऊस थांबल्यावर पुन्हा नागरिकांची झुंबड मुख्य बाजारपेठेकडे वळली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण शुभकार्याचा प्रारंभ करतात. नव्या व्यवसायाची, दुकानांची किंवा सुवर्णपेढ्यांच्या उद्‌घाटनाची तयारीही यानिमित्ताने बाजारपेठेत पाहायला मिळाली. 

मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करण्याची भावना प्रत्येकाची असते. त्यामुळे पाऊस आला तरीही लक्ष्मी (केरसुणी), साळीच्या लाह्या, बत्तासे, चिंच, आवळा, ऊस, साखरेची चित्रे व तत्सम पूजा साहित्याची खरेदी नागरिक करीत होते. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशीला आलेल्या पावसामुळे व्यवसायावर काहीअंशी परिणाम झाला. मात्र, रात्री उशिरापर्यंत नागरिक पणत्या, सुगडी, कारटीचे फळ व विविध प्रकारचे पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी येत होते. 
शिवाजी सावंत, विक्रेते 

आश्‍विन अमावास्येला सायंकाळी लक्ष्मीचा सर्वत्र संचार असतो असे मानतात. या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून लक्ष्मी-कूबेर यांच्या प्रतिमा किंवा मूर्तींचे पूजन करण्याची प्रथा आहे. सायंकाळी घर, दुकान झाडून स्वच्छ करावे. "लक्ष्मी'च्या (केरसुणी) पूजनाला या दिवशी विशेष महत्त्व आहे. यंदा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी चार वाजून 35 मिनिटांपासून रात्री दहा वाजून 45 मिनिटांपर्यंत आहे. पूजनात साळीच्या लाह्या, बत्तासे, झेंडूची फूले असावीत, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain has also been celebrated for Diwali