खरिपाला पावसाने दिला दगा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

सलग चौथ्या वर्षी बारामती उपविभागात खरीप हंगामाला पावसाने दगा दिला आहे. महिनाभर पावसाने पाठ फिरवल्याने यावर्षी 45 हजार हेक्‍टरपैकी 32 हजार 156 हेक्‍टर क्षेत्रातील खरिपाची भुसार पिके संकटात सापडली आहेत.

बारामती (पुणे) : सलग चौथ्या वर्षी बारामती उपविभागात खरीप हंगामाला पावसाने दगा दिला आहे. महिनाभर पावसाने पाठ फिरवल्याने यावर्षी 45 हजार हेक्‍टरपैकी 32 हजार 156 हेक्‍टर क्षेत्रातील खरिपाची भुसार पिके संकटात सापडली आहेत. आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर अनेक भागातील खरिपाची पिके वाया जातील अशी भीती आहे. 

बारामती उपविभागात मागील वर्षीही खरीप हंगाम अल्पसा झाला. यावर्षी बाजरीची पेरणी तर शेतकऱ्यांनी अगदी 91 टक्के एवढी केली, मात्र गेल्या महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने ही पिके सुकून चालली आहेत. बारामती उपविभागात खरीप हंगामात बाजरी व मक्‍याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. उपविभागात बाजरीचे सरासरी क्षेत्र हे 23 हजार 727 हेक्‍टर असून आतापर्यंत 22 हजार 10 हेक्‍टर म्हणजे अगदी 91 टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या.

बारामती तालुक्‍यातील उंडवडी मंडल, दौंड तालुक्‍यातील पाटस मंडलात पावसाने ताण दिल्याने एक महिन्यापासून पाऊस नसल्याने सध्या बाजरीची पिके सुकून चालली आहेत. या खालोखाल मक्‍याचे क्षेत्र 10 हजार 970 हेक्‍टर आहे, मात्र तेथेही केवळ 50 टक्के म्हणजे 5 हजार 271 हेक्‍टरवर पेरणी झाली. मात्र लष्करी अळीने आहे, तेही क्षेत्र धोक्‍यात नेले आहे. सोयाबीनही 900 हेक्‍टरवरून 405 हेक्‍टरवर घटले आहे. 

खरिपाच्या पिकांची यंदाची स्थितीही विचार करायला लावणारी अशीच आहे. पावसाने मोठा ताण दिला असल्याने या आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर खरिपाच्या पिकांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहील. 
- बालाजी ताटे, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain kicked off Kharipa