मराठवाड्यातील काही भागांत गारपीट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - मराठवाड्यातील काही भागांत बुधवारी गारपिटीने झोडपले, तर काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे गहू आणि ज्वारीसह आंबा आणि द्राक्षांचे नुकसान झाले. पुढील चोवीस तासांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

उत्तर कर्नाटकाच्या दुर्गम भागामध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. त्याचा परिणाम मराठवाड्याच्या दक्षिण भागातील लातूर, बीड, उस्मानाबादवर झाला. सकाळपासूनच मेघगर्जनेसह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली. त्यानंतर काही भागांत जोरदार गारा कोसळल्या. उस्मानाबाद जिल्हा आणि औसा (जि. लातूर) तालुक्‍यातील शिवली व बिरवली येथे गारांचा पाऊस झाला. 

"वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे उत्तर भारतात गेल्या चार दिवसांपासून अनेक भागांत पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत घटले आहे. होळीनंतरही नागपूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 1.9 अंश सेल्सिअसने घट होऊन ते 34 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुणे, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, यवतमाळ आणि गोंदिया या भागातील कमाल तापमानाचा पारा खाली उतरला आहे. 

हलक्‍या पावसाची शक्‍यता 
कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून उंचीवर आहे. तसेच मालदीव ते कर्नाटकाच्या परिसरादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता आहे. उर्वरित भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. शनिवार आणि रविवार वगळता पुणे परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

Web Title: rain in marathwada