मुसळधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

कुठे लावली पावसाने हजेरी?
  ठाणे व पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला, तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला 

  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे 

  मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाच्या सरी बरसल्या 

  खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांतही पावसाने चांगलीच हजेरी लावली 

  मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची चांगली हजेरी. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड पावसाच्या सरी पडल्या.

मध्य महाराष्ट्र, विदर्भात दमदार सरींचा अंदाज
पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर आता सर्वदूर पावसाला सुरवात होत असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे गुरुवारी देण्यात आली. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, पावसाची ओढ लागलेल्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पुढील दोन दिवस पावसाच्या दमदार सरी पडतील, असा अंदाजही खात्याने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये रविवारपर्यंत (ता. ३०) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मध्य भारतात मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठीही अनुकूल हवामान सध्या आहे. त्यामुळे सोमवारपासून मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसामध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले. राजस्थानमध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. तसेच, मॉन्सूनचा आस उत्तर प्रदेश ते अरुणाचल प्रदेश, असा आहे. 

मॉन्सूनचे प्रवाह मंदावले 
मॉन्सूनने मुंबईसह राज्याच्या सर्व भागांत दाखल होत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. तसेच दक्षिण गुजरातसह मध्य प्रदेशच्या काही भागांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दोन दिवसांपासून प्रवाह मंदावल्याने मॉन्सूनची प्रगती ‘जैसे थे’ आहे. एक ते तीन जुलैपर्यंत मॉन्सून देशाच्या आणखी काही भागांत प्रगती करणार आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

दोन दिवसांचा अंदाज
  मुसळधार पाऊस - कोकण, विदर्भ
  मध्यम ते हलक्‍या पावसाच्या सरी - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Environment