उत्तर कोकणात धुवाधार

Rain
Rain

पुणे - उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३६५ मिलिमीटर पाऊस पडला, तर सहा ठिकाणी ३०० पेक्षा अधिक पाऊस झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.

दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर ओसरला होता. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यांत मध्यम, मराठवाड्यात हलका पाऊस झाला; तर नागपूर, भंडारासह पूर्व विदर्भात पावसाला सुरवात झाली होती. 

सिंधुदुर्ग - गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेली संततधार थांबली आहे. सोमवारी सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाने उसंत दिल्यामुळे पाणथळीच्या जमिनी नांगरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. 

रत्नागिरी - सलग तीन दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसाने आज पूर्ण विश्रांती घेतली. त्यामुळे लावण्यांच्या कामाला वेग आला आहे. 

नगर - अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी पट्ट्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस सोमवारी काहीसा कमी झाला. जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.  

सातारा - जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, सर्वच तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.

कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर आज ओसरला. अनेक तालुक्‍यांत तुरळक सरी वगळता ढगाळ हवामान, ऊन-सावल्यांचाच खेळ सुरू होता. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील धरण क्षेत्रात पावसाची भुरभूर कायम होती. 

सांगली - जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर आणि जत तालुक्यात पावसाची रिमझिम होती. उर्वरित जिल्‍ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, सकाळपासून थांबून थांबून पाऊस पडत होता. 

नाशिक - नाशिक जिल्ह्यात अनेक भागांत दमदार पावसाची सुरवात झाली असून, पेरण्यांना हळूहळू वेग येऊ लागला आहे. येवला, निफाड, नांदगाव, चांदवड, देवळा, सिन्नर, इगतपुरी व त्रंबकेश्वर तालुक्यांतील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले. अजूनही अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा आहे. 

नांदेड - नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील १० तालुक्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात मात्र बहुतांश भागात उघडीप होती. या तीन जिल्ह्यांतील बहुतांश भागात मोठा पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे.

नागपूर - पूर्व विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, पेरण्यांना देखील वेग आला आहे. आज नागपूर शहर व परिसरात ७५ मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली. 

अकोला - मागील २४ तासांत वऱ्हाडात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचे काम जोमाने सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात बुलडाणा जिल्हा, अकोल्यातील सातपुड्याला लागून असलेले तेल्हारा, अकोट हे तालुके पावसाने झोडपून काढले. पूर्णेलाही पूर आला.

३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस
 तलासरी ३६५
 मालयण ३५०
 अगरवाडी ३३६
 डहाणू ३१३
 सफला ३०५
 मनवर ३०४
(सर्व पालघर जिल्हा)

तीन वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री नदीवरील झालेली दुर्घटना लक्षात घेऊन एस. टी. महामंडळाने बसचालकांना सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत. चालकांनी आपला आणि प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालू नये. पुलांवरून पाणी वाहत असल्यास बसगाड्या नेऊ नयेत. प्रत्येक आगारात आपत्कालीन कक्ष उघडण्यात आले आहेत.
- राहुल तोरो, वाहतूक व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com