पुणेकरांनो, अजून दोन दिवस पाऊस राहणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

शहर आणि परिसरात काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर आला असून मुळा आणि पवना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये पावसाच्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मंगळवारी (ता. 6) हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्‍यता 51 ते 75 टक्के असून, बुधवारनंतर (ता. 7) पावसाचा जोर कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

पुणे - पुण्यात दोन दिवसांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

शहर आणि परिसरात काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर आला असून मुळा आणि पवना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये पावसाच्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मंगळवारी (ता. 6) हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्‍यता 51 ते 75 टक्के असून, बुधवारनंतर (ता. 7) पावसाचा जोर कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

शिवाजीनगर येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये 41.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासून पाच ऑगस्टपर्यंत 707.3 मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान, पाषाण येथे 828.8 आणि लोहगाव येथे 630.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरावरील अतिवृष्टीचा धोका टळला आहे. आगामी तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली असली, तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासनाकडून आवश्‍यक खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'वेधशाळेने चार ऑगस्टला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तसेच, येत्या सहा ते आठ ऑगस्टदरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिला असला, तरी अतिवृष्टीचा धोका टळलेला आहे. जिल्ह्यात मुळशी आणि मावळ तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पुणे शहर, पिंपरी- चिंचवड भागात नदीकाठच्या भागातील तीन हजार 343 कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. त्यांची समाजमंदिर आणि शाळेमध्ये निवास- भोजनाची व्यवस्था केली आहे. पाणी ओसरल्यानंतर घरांचे पंचनामे करून त्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येईल. जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 18 धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित धरणांमध्येही पाणीसाठा 95 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे.'' 

चार तालुक्‍यांमध्ये कमी पाऊस 
जिल्ह्यात पाच ऑगस्टअखेर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 108 टक्के पाऊस पडला आहे. त्यात मावळ तालुक्‍यात 200 टक्के, मुळशी 134 टक्के, भोर 141 टक्के, जुन्नर 127 टक्के आणि खेड तालुक्‍यात 139 टक्के पाऊस झाला आहे. मात्र इंदापूर तालुक्‍यात 31 टक्के, दौंड 40 टक्के, बारामती 58 टक्के आणि शिरूर 59 टक्के पाऊस झाला आहे. या चार तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे. बंडगार्डन येथून सध्या एक लाख 34 हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, ही पातळी धोक्‍याच्या रेषेखालील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Pune Water Weather Department