ऐन पावसात पालिकेची पावसाळी कामे जोरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

पुणे - पावसामुळे मुंबई जलमय झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात तातडीने उपाययोजना करण्यास सुरवात झाली असून, लोकवस्ती आणि वाहतुकीच्या रस्त्यांवर कुठेही पाणी तुंबणार नाही, यासाठी महापालिकेने आवश्‍यक ती कामे हाती घेतली आहेत. मुख्यत: पावसाळी गटारे, सांडपाणी वाहिन्यांमधील गाळ काढण्यासोबत वाहिन्यांच्या झाकणांची (चेंबर) दुरुस्ती करण्यात येत आहे. लोकवस्त्यांच्या परिसरातून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यांची साफसफाईही करण्यात येत आहे. 

शहरात पावसाळीपूर्व कामे झाली नसल्याने गेल्या महिन्यात पावसामुळे काही भागातील घरे, सोसायट्या आणि रस्त्यांवर प्रचंड पाणी शिरले होते.

वाहनांची वर्दळ असलेल्या बहुतांशी रस्त्यांवरही पाणी तुंबल्याचे दिसून आले आहे. पावसाळी गटारे आणि सांडपाणी वाहिन्यांची सफाई झाली नसल्याचे आढळून आले. उपनगरांमधील विशेषत: विश्रांतवाडी, वडगाव शेरी, कळस, धानोरीतील घरांमध्ये पाणी शिरले. या भागातील वाढते नागरीकरण आणि पाणी वाहून नेणाऱ्या अपुऱ्या यंत्रणेमुळे जागोजागी पाणी तुंबत असल्याचे महापालिकेच्या पाहणीतून आढळून आले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, याकरिता तेवढी यंत्रणा नसल्याचेही पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे उघड झाले आहे. त्यात, पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सकाळपासूनच गटारे, वाहिन्यांची दुरुस्ती आणि त्यातील गाळ काढण्यात येत आहे. त्यासाठी पुढील चार दिवस क्षेत्रीय कार्यालयांची यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना केली आहे.

वेगवेगळ्या भागातील दोनशे ते अडीचशे किलोमीटर लांबीची पावसाळी गटारे तर, पाचशे किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

शहरात काही भागात पावसात पाणी साचते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. ती दूर करण्यासाठी सर्वच भागात पावसाळीपूर्व कामे करण्यात येत आहेत. नव्याने काही कामे सुरू आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याचा वेळेत निचरा होण्यास मदत होईल. ओढ्या-नाल्यांचीही कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेलाही सूचना केल्या आहेत.
- विजय दहिभाते, उपायुक्त 

Web Title: rain municipal work