शहर परिसरात आज हलक्‍या सरींची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

शहर परिसरात येत्या शनिवारी (ता. 14) ढगाळ वातावरण रहाणार असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली.

पुणे - शहर परिसरात येत्या शनिवारी (ता. 14) ढगाळ वातावरण रहाणार असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली.

शहरात गुरुवारी संध्याकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या. शुक्रवारी सकाळीही पाषाण, सिंहगड रस्ता, कर्वेनगर, कोथरुड, वारजे भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शहरातील मध्य वस्तीसह उपनगरांमध्ये दुपारी पावसाची मोठी सर आली. पुढील चोविस तासांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी हजेरी लावणार आहेत.

राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मध्य कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते जोरदार सरी येत आहेत. पावसासाठी पोषक हवामान होण्याचे संकेत असल्याने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाब क्षेत्र मध्य भारतातील राज्यांमध्ये स्थिरावल्याने विदर्भ, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. विदर्भातील तळाशी गेलेल्या गोसीखुर्द, तोतलाडोह, वर्धा धरणात चांगला पाणीसाठा झाला. या धरणातून पाण्याचा विसर्गही करावा लागला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांमधून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी, अधून-मधून येणाऱ्या सरींमुळे पाणलोटातून धरणांमध्ये पाण्याची आवकही सुरूच आहे.

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असून, मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्‍यता आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानासह हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Pune